Nagpur South West Assembly Constituency: भाजप आणि काँग्रेस अशा दोन्ही प्रमुख पक्षांकडून जोरदार प्रचार करण्यात येतो आहे. दोन्ही उमेदवारांनी राज्यातील आणि देशभरातील मोठ्या नेत्यांना आपल्या प्रचारासाठी मतदारसंघात आमंत्रित केले असून रोज अशा मोठ्या प्रचारसभा मतदारसंघात सुरू आहे.
भाजप आणि काँग्रेस अशा दोन्ही प्रमुख पक्षांकडून जोरदार प्रचार करण्यात येतो आहे. दोन्ही उमेदवारांनी राज्यातील आणि देशभरातील मोठ्या नेत्यांना आपल्या प्रचारासाठी मतदारसंघात आमंत्रित केले असून रोज अशा मोठ्या प्रचारसभा मतदारसंघात सुरू आहे. विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांपासून ते केंद्रीय मंत्र्यापर्यंत अनेक नेत्यांनी या आधीच प्रचारसभा घेतल्या आहेत. भाजपचे उमेदवार देवेंद्र फडणवीस यांच्यावर राज्यातील निवडणुकीचीही जबाबदारी असल्याने ते दररोज वेगवेगळ्या ठिकाणी सभा घेत आहेत. त्यांच्या मतदारसंघातील जनतेला माध्यमातून त्यांचे विचार कळत आहेत. त्यांच्या अनुपस्थित, राजू हडप, प्रकाश भोयर, रितेश गावंडे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते प्रचाराची धुरा सांभाळत आहेत.
दोन मोठ्या प्रचारयात्रा त्यांनी केल्या. एक सभा त्यांनी स्वतःसाठी घेतली. आता त्यांची टीम’ मी देवेंद्र’ म्हणून, देवेंद्रदूत म्हणून घरोघरी जात आहे. नागपूर शहरातून सलग सहावेळा विजयी होण्याचा विक्रम घडविण्याच्या तयारीत त्यांचे कार्यकर्ते लागले आहेत. छोटी मंडळे, सामाजिक संस्था, महिला मंडळे यांच्या भेटी घेणे सुरू आहे. फडणवीस यांचे सर्वांत प्रबळ प्रतिस्पर्धी असलेले प्रफुल्ल गुडधे रोज प्रचार यात्रेच्या निमित्ताने प्रत्येक वस्तीत फिरत आहेत. मतदारांशी वैयक्तिक संपर्क साधणे आणि विविध भागांत प्रचार फेऱ्या काढणे यांवर भर दिला आहे. निवडणुकीची घोषणा होण्याआधीपासून ते मतदारसंघात सक्रिय झाले होते.
मागील आठ दिवसांत त्यांनी हा प्रचार अधिक व्यापक केला आहे. येथील काही कार्यकर्ते पश्चिमेत गेले आहेत. गुडधेंनी कन्हैय्याकुमारसारख्या वक्त्यांच्या सभा घेऊन प्रचारात रंग भरण्याचा प्रयत्न केला आहे. २०१४ साली ते फडणवीसांच्या विरोधात लढले होते. त्यावेळी झालेल्या पराभवातून शिकलेले धडे ते यावेळी अंमलात आणत आहेत. फडणवीसांना विक्रमापासून रोखण्याचे अवघड प्रयत्न ते करत आहेत. वंचित बहुजन आघाडीचे विनय भांगे हेदेखील प्रचारात वैयक्तिक संपर्कावर भेट देताना दिसून आले आहे. फडणवीस काय किंवा गुडधे काय दोघेही भाजपच्याच कुळाचे आहेत. त्यामुळे भाजप विरोधी मतदारांनी आम्हाला साथ द्यावी असे आवाहन भांगे करीत आहेत.
पुन्हा कौल की बदलाला साथ?
या दोन उमेदवारांच्या तुलनेत इतरांचे बळ कमी आहे. त्यामुळे, नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघात थेट निवडणूक होणार असल्याची चिन्हे आहेत. पुढील तीन दिवसांत येथील प्रचार आणखी तीव्र होणार आहे. राज्यातील मोठे नेते असलेले देवेंद्र फडणवीस यांना ‘पुन्हा कौल’ की प्रफुल्ल गुडघे घालत असलेली ‘बदलाची साद’ यापैकी नेमके काय वरचढ ठरते हे लवकरच स्पष्ट होणार आहे.