Ghansawangi Vidhan Sabha Constituency: राजेश टोपे यांच्या विरोधी मतांच्या विभाजनाच्या इतिहासात १९९९ मध्ये भीमराव डोंगरे आणि शिवाजीराव चोथे यांना एकत्रित मिळालेल्या ६६ हजार ६१८ मतांच्या तुलनेत टोपे ५२ हजार १७ मते घेऊन विजयी झाले होते.
घनसावंगी विधानसभा मतदारसंघ हा मराठा आरक्षण आंदोलनाचे मध्यवर्ती केंद्र आहे. लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत आरक्षणाच्या आंदोलनाचे फारसे पडसाद विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात दिसत नाहीत. मनोज जरांगे पाटील घनसावंगीत तटस्थ आहेत. राजेश टोपे यांच्या विरोधात यापूर्वी सलग दोन वेळा डॉ. हिकमतराव उढाण पराभूत झाले होते. आता तिसऱ्यांदा शिवसेनेकडून उमेदवारी मिळवत ते लढत आहेत. समृद्धी साखर कारखान्याचे अध्यक्ष आणि भाजपचे नेते सतीश घाडगे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार शिवाजीराव चोथे यांनी बंडखोरी केली आहे.
ओबीसी आरक्षण बचाव आंदोलनाचे नेते बळीराम खटके यांच्या पत्नी कावेरी खटके, निवृत्त सहाय्यक जिल्हाधिकारी दिनकर जायभाये, राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार रमेश वाघ यांच्यासह २३ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. राजेश टोपे यांच्या विरोधी मतांच्या विभाजनाच्या इतिहासात १९९९ मध्ये भीमराव डोंगरे आणि शिवाजीराव चोथे यांना एकत्रित मिळालेल्या ६६ हजार ६१८ मतांच्या तुलनेत टोपे ५२ हजार १७ मते घेऊन विजयी झाले होते.
२००४ मध्ये विलास खरात आणि चोथे यांच्या एकत्रित ८२ हजार ४४१ मतांच्या तुलनेत ७६ हजार ८१६ मतांच्या फरकाने टोपे विजयी झाले. सन २००९ मध्ये अर्जुन खोतकर यांच्या विरोधातील थेट लढतीत टोपेंचा विजय २३ हजार ३०६ मताधिक्याने झाला. सन २०१४मध्ये विलास खरात आणि डॉ. हिकमतराव उढाण यांच्या एकत्रित एक लाख २२१ मतांच्या तुलनेत टोपे यांना ९८ हजार ३० मते मिळाली होती. सन २०१९मध्ये डॉ. उढाण आणि एका विरोधी उमेदवाराच्या एकत्रित एक लाख १३ हजार ७३६ मतांच्या तुलनेत टोपे यांना एक लाख सात हजार ८४९ मते मिळाली आहेत. गोदावरीच्या काठावरील शहागड, गोंदी पट्टयातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना टोपे यांच्या अंकुशराव टोपे समर्थ साखर कारखान्यास घाडगे यांचा समृद्धी साखर कारखाना हा पर्याय आहे.
डॉ. हिकमतराव उढाण यांचा तीर्थपुरी परिसरातील खासगी साखर कारखाना आणि कुंभार पिंपळगाव येथील रेणुकादेवी सहकारी साखर कारखाना यांचे पर्याय शेतकऱ्यांना उपलब्ध झाल्याने टोपे यांचा त्या क्षेत्रातील एकाधिकार संपला आहे. उढाण यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन वेळा घनसावंगीत येऊन गेले. रांजणी सर्कल आणि जालना तालुक्यातील ४० गावांतील मतदारांचा कौल मिळवण्यासाठी उढाण आणि घाडगे यांच्यात स्पर्धा आहे. दोन साखर कारखान्यांसह यशवंत सूतगिरणी, चाळीसहून अधिक गावातील मत्योदरी शिक्षण संस्थेच्या शाळा, महाविद्यालये संस्थांचा मोठा परिवार टोपेंची हक्काची मतभेटी आहे.
आरक्षण आंदोलनाचा प्रभाव निवडणूक प्रचार दौऱ्यात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी भाजपचे माजी आमदार विलास खरात यांच्या निवासस्थानी दिलेली भेट, मराठा आरक्षण आंदोलन, ओबीसी आरक्षण समर्थकांचे आंदोलन या पार्श्वभूमीवर यंदाचे राजकीय समीकरण बदलणार आहे. मराठा समाजाच्या मतांची टोपे, घाडगे आणि उढाण यांच्यामधील होणारे संभाव्य विभाजन अशा सर्व मुद्द्यांवर विजयी उमेदवार ठरणार आहे.