Prahar Candidate Bipin Chaudhary Car Fire: बिपीन चौधरी हे यवतमाळच्या गुरुकृपा नगरीमध्ये वास्तव्यास आहे. काल रात्री अडीच वाजताच्या दरम्यान अज्ञात आरोपींनी त्यांची एमएच २९ एआर ३४२३ या क्रमांकाची महिन्द्रा कंपनीची केयुव्ही १०० ही कार पेटवून दिली.
हायलाइट्स:
- प्रहारचे उमेदवार बिपीन चौधरी यांची कार पेटवली
- राजकीय व्देषाचा संशय, माघार घेणार नसल्याचं स्पष्टीकरण
- बिपीन चौधरींचा कुणबी समाजात वाढता प्रभाव
कुणबी समाजात वाढता प्रभाव
यवतमाळ विधानसभा मतदार संघात जवळपास ७५ हजार कुणबी-मराठा मतदार आहेत. एवढी मोठी संख्या असतानाही एकाही मोठ्या राजकीय पक्षाने समाजाला प्रतिनिधीत्व न दिल्याने समाजात नाराजी आहे. त्यामुळेच कुणबी-मराठा समाजाच्या वतीने नुकतेच बिपीन चौधरी यांच्याकरता सहविचार सभेचे आयोजन केले होते. या सभेत बिपीन चौधरी यांच्या पाठीशी उभं राहण्याचा निर्णय समाजबांधवांनी घेतला. बिपीन चौधरी यांच्या कुणबी समाजातील वाढत्या प्रभावामुळे अनेकांनी धास्ती घेतली असून दबाव निर्माण करण्याच्या उद्देशाने हे कृत्य केलं असल्याचा संशय आहे.
सामाजिक कार्यात अग्रेसर
यवतमाळ विधानसभा मतदारसंघात गेल्या २५ वर्षांपासून कुणबी मराठा समाज राजकीयदृष्ट्या वंचित आहे. एवढी मोठी समाजाची संख्या असतानाही प्रतिनिधीत्व दिले जात नाही. त्यामुळे बिपीन चौधरी यांनी प्रहारच्या माध्यमातून उमेदवारी दाखल केली आहे. बिपीन चौधरी हे कुणबी समाजातील युवा नेत्रृत्व असून सामाजिक कार्यात ते सदैव अग्रेसर राहतात. करोना काळात तर त्यांनी हजारो नागरिकांना मदत करुन त्यांचे जीव वाचवले होते.