Uddhav Thackeray : …म्हणून राज ठाकरेंसोबत युती नाही, उद्धव ठाकरे यांनी स्पष्टच सांगितलं

Uddhav Thackeray on Raj Thackeray : उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्यासोबत युती होण्याची शक्यता फेटाळून लावली आहे. महाराष्ट्राच्या हितासाठी ‘लुटारूंना’ पाठिंबा देणाऱ्यांशी हातमिळवणी करणार नाही, असे ते म्हणाले. २०१९ च्या आधी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत कोणतीही गुप्त बैठक झाली नसल्याचेही ठाकरेंनी स्पष्ट केले.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबई : राज्याच्या राजकारणामध्ये आतापर्यंत अनेक युती आणि आघाडी झाल्याच्या पाहायला मिळालं. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आता २०१९ च्या सत्तानाट्याआधी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप नेत्यांच्या बैठका झाल्याचा खुलासे आता नेतेमंडळी करत आहेत. त्यावेळी भाजप आणि राष्ट्रवादीचे सरकार स्थापन झाले नाही. पण शरद पवारांनी उद्धव ठाकरे आणि काँग्रेसला सोबत घेत महाविकास आघाडीची स्थापना केली होती. एकंदिरत निवडणुकीआधी आणि नंतर राज्यात अनेक पक्ष एकत्र आले आणि गेले पण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे कधी एकत्र येणार? याची वाट महाराष्ट्राची जनता पाहत आहे. अशातच उद्धव ठाकरे यांनी एका मुलाखतीमध्ये मनसेसोबत युती का नाही या प्रश्नाचे उत्तर दिलं आहे.

मी मुख्यमंत्रिपदाबाबत सांगितलं की महाराष्ट्राचे लुटारू नको आहेत. राज ठाकरेंनी जाहीर केलं आहे की मुख्यमंत्री कोण व्हायला पाहिजे. मग महाराष्ट्राचा लुटारू मुख्यमंत्री होणार असेल तर आणि त्याला त्यांचा पाठिंबा असेल तर त्यांच्यासोबत माझी युती होऊ शकत नाही. मी महाराष्ट्राशी बांधिल आहे, माझ्या वडिलांनी शिवसेना पक्षाची स्थापना भूमिपुत्रांशी, मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी केलीये. महाराष्ट्राच्या लुटारूंना सत्तेत बसवण्यासाठी नाही केली. त्याच्यामुळे माझं धोरण मी स्पष्ट केलं आहे तसं त्यांनीही करावं. त्यांनी पहिलं पक्षाचं नाव मनसे आहे की गुनसे आहे हे ठरवावं. बोलायला क्लेशकारक आहे, माझं नाते माझ्या महाराष्ट्राशी आहे. तो लुटला जात आहे हे मी उघड्या डोळ्यांनी पाहू शकत नाही. लुटारूंना मदत करणाऱ्यांना मी मदत करण म्हणजे महाराष्ट्राशी मी विश्वासघात करत आहे. त्यामुळे महाराष्ट्रासोबत विश्वासघात करणाऱ्यांसोबत युती करणार नसल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

मी कधीही कोणाशी विश्वासघात करत नाही. २०१४ ते २०१९ माझी एकही गुप्त मीटिंग अदानी असताना नसताना काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत झाली नाही. मी आयुष्यात पहिल्यांदा २०१९ मध्ये यांनी धोका दिल्यावर सोनिया गांधी यांच्याशी बोललो. शरद पवार हे बाळासाहेबांचे मित्र होते, घरी आले तरी फक्त बघायचो पण वयाचं अंतर असल्याने बैठकीत बसलो नाही, राजकीय चर्चा ही २०१९ झाली. मी भाजपच्या कारभाराबद्दल मी बोलत होतो पण मी महाविकास आघाडीचे सरकार बनवण्याचा प्रयत्न केला नव्हता, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

लेखकाबद्दलहरिश मालुसरे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. क्रीडा, राजकीय आणि क्राईम बातम्यांमध्ये विशेष आवड. झी 24 तास आणि टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 04 वर्षांचा अनुभव…. आणखी वाचा

Source link

raj thackerayRaj Thackeray Newsraj thackeray speechUddhav ThackerayUddhav Thackeray newsVidhan Sabha Nivadnuk
Comments (0)
Add Comment