Khadakwasla Vidhan Sabha Opinion Poll : पुण्यातील भाजपचा बालेकिल्ला असलेल्या खडकवासला मतदारसंघात मोठा बदल पाहायला मिळण्याची शक्यता आहे. यंदाच्या तिरंगी लढतीमुळे या कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
खडकवासला मतदारसंघात तिरंगी लढत
खडकवासला मतदारसंघामध्ये भाजपचे विद्यमान आमदार भीमराव तापकीर, शरद पवार गटाचे सचिन दोडके आणि मनसेकडून मयुरेश वांजळे यांच्यात ही तिरंगी लढत होणार आहे. भीमराव तापकीर यांना भाजपने पुन्हा तिकीट दिले आहे. मात्र भाजपच्या पहिल्या आणि दुसऱ्या यादीतही त्यांचे नाव नसल्याने तापकीर गॅसवर होते, मात्र शेवटी त्यांनाच पक्षाने तिकीट दिले. मागील निवडणुकीमध्ये अवघ्या २५०० मतांनी पराभूत झालेले उमेदवार सचिन दोडके शरद पवार गटाकडून उभे आहेत. हे दोन्ही उमेदवार तगडे असल्याने त्यांच्यात बिग फाईट होणारच होती. मात्र या दोन्ही नेत्यांचे तिकीट जाहीर होण्याआधी मनसेकडून मयुरेश वांजळे यांना तिकीट जाहीर झाले होते.
मयुरेश वांजळे हे माजी दिवंगत आमदार रमेश वांजळे यांचे सुपुत्र आहेत. २००९ साली मनसेकडून रमेश वांजळे निवडून आले होते. महाराष्ट्राभर रमेश वांजळे यांची गोल्डन मॅन म्हणून ओळख होती. आता मयुरेश वांजळे यांना तिकीट देत पुन्हा एकदा काही चमत्कार होऊन ज्युनिअर वांजळे जायंट किलर ठरतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. राज ठाकरे यांनी मयुरेश वांजळे यांच्यासाठी सभा घेतली होती.
महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन यूट्यूब चॅनलवर घेतलेल्य पोलमध्ये जनतेचा कौल जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यामध्ये एकूण ९० हजारांहून अधिक लोकांनी सहभाग घेतला. तर गेल्या २५ तासांमध्ये या पोलमध्ये मयुरेश वांजळे यांनी वन साईड बाजी मारल्याचं दिसून आलं. मयुरेश वांजळे यांना ५७ टक्के तर सचिन दोडके यांना २६ टक्के आणि भीमराव तापकीर यांना १७ टक्क्यांसह तिसऱ्या क्रमांकावर राहिले आहेत.
दरम्यान, हा ऑनलाईन पोल असल्याने खडकवासला मतदारसंघाबाहेरील लोकांनीही पोलमध्ये सहभाग घेतला असू शकतो. त्यामुळे हे आकडे मतदानाचे निदर्शक नाहीत, आता एक आठवड्यामध्ये मतदारराजा खरी आकडेवारी देत कोणाला विजयाचा गुलाल उधळण्याची संधी देणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.