Maharashtra Assembly Election 2024: काँग्रेसच्या तीन उमेदवारांच्या प्रचारासाठी रेवंत रेड्डी, सचिन पायलट आणि विनेश फोगट शहरात येणार आहेत. या तीन मतदारसंघांत या नेत्यांच्या सभा आणि रॅली होतील,’ असे काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी सांगितले.
त्या दिवशी स्टार प्रचारकांच्या उपस्थितीत जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याचे नियोजन शहर काँग्रेसतर्फे सुरू आहे. तरुणाईमध्ये लोकप्रिय नेत्यांद्वारे प्रचाराचा धुरळा उडवला जाणार आहे. ‘शहरातील आठ मतदारसंघापैकी कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातून रवींद्र धंगेकर, पुणे कँटोन्मेंट विधानसभा मतदारसंघातून रमेश बागवे आणि शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून दत्ता बहिरट या काँग्रेसच्या तीन उमेदवारांच्या प्रचारासाठी रेवंत रेड्डी, सचिन पायलट आणि विनेश फोगट शहरात येणार आहेत. या तीन मतदारसंघांत या नेत्यांच्या सभा आणि रॅली होतील,’ असे काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी सांगितले.
स्टार प्रचारकांच्या तारखा मिळविण्यात अपयश
भाजपतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह दिग्गज नेत्यांच्या सभा पुण्यात झाल्या असताना काँग्रेस आणि महाविकास आघाडीकडून स्टार प्रचारकांच्या सभा शहरात झालेल्या नाहीत. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार नेते संजय राऊत हे नेते अपवाद ठरले.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, गटनेते बाळासाहेब थोरात, खासदार सुप्रिया सुळे व प्रणिती शिंदे यांच्या तारखा महाविकास आघाडीकडून मागण्यात आल्या होत्या. मात्र, या नेत्यांना पुण्यात आणणे महाविकास आघाडीला जमलेले नाही.