Sharad Pawar in Madha criticized Babanrao Shinde : ज्यांना ४० वर्ष साथ दिली ते ईडीच्या नोटीसचं कारण सांगून पळून गेले, त्यांचा असा पराभव करा, की गद्दारीचं धाडस होणार नाही, अशा शब्दांत शरद पवार यांनी सभेत बोलताना जनतेला आवाहन केलं आहे.
सहा वेळा आमदार, राष्ट्रवादी फुटल्यानंतर अजित पवारांची साथ दिली
माढा विधानसभा मतदारसंघात सहा वेळा आमदार राहिलेले बबनदादा शिंदें यांनी राष्ट्रवादीच्या पक्षफुटीनंतर अजित पवारांसोबत जाणे पसंद केले होते. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदारसंघात बबनदादा शिंदें यांचे पुत्र रणजित शिंदे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरत, महायुती आणि महाविकास आघाडी विरोधात लढत आहेत.
तीन विधानसभा मतदारसंघासाठी शरद पवारांची टेम्भुर्णीत सभा
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची रविवारी टेम्भुर्णी येथे मोठी सभा संपन्न झाली. माढा विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित पाटील, मोहोळ विधानसभेचे राजू खरे, पंढरपूर विधानसभेचे अनिल सावंत, माळशिरस विधानसभेचे उत्तम जानकर यांच्या प्रचारार्थ टेंभुर्णी येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते.
गद्दारांना धडा शिकवा; गद्दारी करण्याचे पुन्हा धाडस करणार नाही
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी टेम्भुर्णीत जोरदार भाषण केले. राष्ट्रवादी सोडून गेलेल्यांवर सडकून टीका केली. राष्ट्रवादी सोडून गेलेल्यांना गद्दार अशी उपमा देत हल्लाबोल केला. पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून बबनदादा शिंदे यांना आजवर सर्व मदत केली. जेव्हा मला साथ देण्याची गरज होती तेव्हा ते ईडीला घाबरुन दुसऱ्या पक्षात पळून गेले. अशा गद्दार आणि पळपुट्या पिता पुत्राचा विधानसभा निवडणुकीत असा पराभव करा की पुन्हा गद्दारी करण्याचे कोणी धाडस करणार नाही असा घणाघात शरद पवार यांनी केला.
मी अडचणीत आल्यावर ईडीचे कारण देत पक्ष सोडून गेले – शरद पवार
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी टेम्भुर्णीत भाषण करताना जुन्या आठवणी सांगितल्या. शरद पवार म्हणाले, ‘शिंदेंना गेली चाळीस वर्षे आपण साथ दिली. पक्ष आणि मी अडचणीत आल्यानंतर शिंदेंनी मला साथ देणे अपेक्षित होते. मात्र ईडीची नोटीस आल्याचे कारण देत, पक्ष सोडून पळून गेले. स्वतःच्या स्वार्थासाठी पक्ष सोडून पळून गेले. मी जेव्हा माढा लोकसभेचा खासदार झालो तेव्हा बबनराव शिंदे यांच्यावर विश्वास टाकत मतदारसंघाचा विकास निधी खर्च करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य त्यांना दिले होते. पण ऐन अडचणीच्या काळात त्यांनी साथ सोडली.’
Sharad Pawar : शिंदें पिता-पुत्राचा असा पराभव करा की, गद्दारीचं धाडस कोणी करणार नाही; माढ्यातून शरद पवार कडाडले
‘पक्ष फुटल्यानंतर शिंदेंसह सोडून गेलेल्या सर्वानांच इशारा देताना त्यांनी अंतुले मुख्यमंत्री असताना ५८ पैकी ५२ आमदार फुटले होते. त्यावेळी पुढील निवडणुकीत त्या सर्व ५२ आमदारांच्या विरोधात नवीन चेहऱ्यांना संधी दिली आणि सर्व फुटीर आमदारांचा पराभव केल्याची आठवण सांगून त्यांचीच पुनरावृत्ती माढ्यात करून अभिजित पाटील यांना निवडून देण्याचे आवाहन केले.