Uddhav Thackeray: यंदाची निवडणूक राज्याच्या भविष्याच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाची आहे. कारण महाराष्ट्रद्रोही विरुद्ध महाराष्ट्रप्रेमी अशी ही निवडणूक आहे, अशा शब्दांत शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी मुंबईतील बीकेसीत भाषण करताना महायुती सरकारला पराभूत करण्याचं आवाहन केलं.
‘मला पंकजा मुंडेंना धन्यवाद द्यायचे आहेत. कारण आमच्या महाराष्ट्राच्या डोळ्यावरची पट्टी तू काढलीस. पंकजा मुंडेंनी काय सांगितलंय, भाजपचं काम म्हणजे लय भारी असतं बघा. आपल्याकडे बूथ किती आहेत महाराष्ट्रभर? ९० हजार. प्रत्येक बूथवर एक दक्षता पथक आहे. ९० हजार बूथवर दक्षता पथकं म्हणजे एकापेक्षा अधिक माणसं असणार. एक माणूस जरी धरला तरी ९० हजार बूथवर ९० हजार माणसं. दोन धरली तर १ लाख ८० हजार. तीन धरली तर त्याच्या पटीत आणि सगळी माणसं गुजरातमधून भाजपनं इकडे आणली आहेत आपल्यावर नजर ठेवायला. आज नजर ठेवायला आणली आहेत. उद्या मुंबई बळकावण्याचा यांचा डाव आहे. हे काही फेक नरेटिव्ह नाही ना? हे उद्धव ठाकरे पंकजा मुंडे बोलल्यानंतर बोलतोय,’ असं ठाकरे महाविकास आघाडीच्या सभेत म्हणाले.
‘राज्यातील भाजप हरलेली आहे. इथल्या भाजपमध्ये लोक राहिलेले नाहीत. विशेष म्हणजे महाराष्ट्रात राहणाऱ्या भाजप प्रेमींवर भाजप नेतृत्त्वाचाच विश्वास आहे. त्यांचा कोणावरच विश्वास नाही. त्यामुळे परराज्यातून माणसं आणली जात आहेत आणि त्यांच्या माध्यमातून नजर ठेवली जातेय. हा सगळा प्रकार सांगितल्याबद्दल मी पंकजा ताईंचा आभारी आहे,’ असं ठाकरेंनी म्हटलं.
‘आतापर्यंत मी अनेक निवडणुका पाहिल्या. शिवसेनेचा स्टार प्रचारक म्हणून निवडणुकीत फिरलेलो आहे. यंदा निवडणूक काळात तीन ते चार वेळा माझ्या बॅगांची तपासणी झाली. खरं तर त्या बॅग कंपनीला मी एक पत्रच लिहिणार आहे. तुमचा ब्रँड ऍम्बेसेडर म्हणून माझी नियुक्ती करा. माझ्या बॅगा तपासल्या, हरकत नाही. पण या सगळ्या पथकांचा खर्च कोण करतंय? ते नेमकं काय करताहेत? कारण यांच्या रात्रीच्या बैठका चालल्या आहेत. सगळ्यांकडून आढावा घेत आहेत. अशा पद्धतीनं बाहेरच्या राज्यातून माणसं आणून, इथल्या माणसांवर नजर ठेवली गेली, अशी कोणतीही निवडणूक आतापर्यंत कधीही झालेली नव्हती,’ अशा शब्दांत ठाकरे भाजपवर बरसले.