Pratibha Pawar: राष्ट्रवादी काँग्रेस शपचे अध्यक्ष शरद पवारांच्या पत्नी प्रतिभा पवार यांना बारामती टेक्सटाईल पार्कच्या गेटवर अडवण्यात आल्याची घटना आज दुपारच्या सुमारास घडली.
शरद पवारांच्या पत्नी प्रतिभा पवार आणि त्यांची नात रेवती सुळे यांना दुपारच्या सुमारास बारामती टेक्सटाईल पार्कच्या गेटवर रोखण्यात आलं. त्याबद्दल व्यवस्थापक अनिल वाघ यांनी वस्तुस्थिती सांगितली. ‘हा गेट माल वाहतुकीचा आहे. या गेटनं माल वाहतूक करणारी वाहनं येत असतात. पार्कमध्ये येणाऱ्यांसाठी दुसरे गेट उपलब्ध आहेत. प्रतिभाकाकी ज्या गेटवर आल्या, त्या गेटवर असलेला वॉचमन, सिक्युरिटी गार्ड परप्रांतीय होता. तो प्रतिभाकाकींना ओळखत नव्हता. प्रतिभाकाकी गेटवर आल्याचं मला जेव्हा समजलं, तेव्हा काही क्षणांतच मी सुरक्षा रक्षकांना त्यांना आत सोडण्याच्या सूचना केल्या,’ असं वाघ यांनी सांगितलं.
‘थोड्या वेळानं प्रतिभाकाकी आत असलेल्या विविध कंपन्यांमध्ये गेल्या. त्यांनी महिलांशी संवाद साधला. त्यावेळी तिथे असलेल्या सुरक्षा रक्षकांनी मला सांगितलं की, प्रतिभाकाकींसोबत आलेल्या महिला विचारत होत्या की शॉपिंग कॉम्प्लेक्स कुठेय? शॉपिंग कॉम्प्लेक्स या गेटपासून अर्धा किलोमीटरवर आहे. त्यामुळे सुरक्षा रक्षकांनी त्यांना तशा प्रकारच्या सूचना केल्या की तुम्ही शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या दुसऱ्या गेटनं जा,’ अशा शब्दांत वाघ यांनी घडलेला प्रकार कथन केला.
‘मला ज्या क्षणी समजलं की प्रतिभाकाकी आणि रेवतीताई आलेल्या आहेत, मी काही क्षणांतच त्यांना आत सोडलं. त्यांनी आत कामगारांशीदेखील संवाद साधला. सगळ्यांना भेटून गेल्या. दोन-तीन दिवसांपूर्वी युगेंद्रदादा, सुप्रियाताई यासुद्धा इथे येऊन गेल्या आहेत. या अगोदरही प्रतिभाकाकी किंवा रेवती ताई अनेक वेळा येऊन गेलेल्या आहेत. त्यांचं आम्ही स्वागतच केलेलं आहे,’ असं वाघ म्हणाले.
‘आम्हाला जर त्यांनी पूर्वकल्पना दिलेली गेली असती, तर आम्ही त्यांच्या स्वागतासाठी गेटवर हजर झालो असतो. पण त्यांच्याकडून आम्हाला कोणतीही पूर्वकल्पना दिली गेलेली नव्हती. त्याबद्दल त्यांना जर का तसदी झाली असेल, तर आम्ही क्षमा मागतो. एवढ्या प्रतिभावंत व्यक्तीला अडवण्याएवढा मी मोठा नाही. मी एक साधा नोकर आहे,’ असं वाघ शेवटी म्हणाले.