Pratibha Pawar: राष्ट्रवादी काँग्रेस शपचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांना बारामती टेक्सस्टाईल पार्कमध्ये जाण्यापासून रोखण्यात आल्याचा प्रकार घडला आहे.
शरद पवारांच्या पत्नी प्रतिभा पवार आज बारामती टेक्सस्टाईल पार्कमध्ये गेल्या होत्या. पण त्यांची कार रोखण्यात आली. त्यांना प्रवेश नाकारण्यात आला. आम्हाला आत सोडू नका, यासाठी सीईओंचा फोन आला होता का, अशी विचारणा प्रतिभा पवारांनी सुरक्षा रक्षकांकडे केली. पण त्यांनी उत्तर दिलं नाही. प्रतिभा पवार यांना टेक्सस्टाईल पार्कच्या प्रवेशद्वारावर का रोखण्यात आलं, त्यांना प्रवेश का नाकारण्यात आला, या प्रश्नांची उत्तरं अद्याप मिळू शकलेली नाहीत.
उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पत्नी आणि राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार बारामती टेक्सस्टाईल पार्कच्या अध्यक्षा आहेत. प्रतिभा पवार सध्या नातू युगेंद्र पवार यांचा प्रचार करत आहेत. युगेंद्र पवार त्यांचे काका अजित पवारांविरोधात निवडणूक लढवत आहेत. युगेंद्र पवार यांच्या प्रचारात उतरलेल्या प्रतिभा पवार सध्या मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत. रेवती सुळेदेखील युगेंद्र पवारांचा सक्रिय प्रचार करत आहेत. या राजकीय कारणांमुळेच प्रतिभा पवारांना बारामती टेक्सस्टाईल पार्कच्या बाहेर रोखलं का, अशी चर्चा सुरु झाली आहे.
विशेष म्हणजे प्रतिभा पवार करत असलेल्या प्रचाराबद्दल अजित पवारांनी एका मुलाखतीत आश्चर्य व्यक्त केलं होतं. ‘आमच्या प्रतिभा काकी, ज्या मला आईसमान आहेत. त्या गेल्या ४० वर्षांत कधीही अशा घरोघरी जात नव्हत्या. त्याही आता घराघरांत जात आहेत. असं कधीच घडलेलं नव्हतं. मलाही या गोष्टीचं आश्चर्य वाटतं. अजितला पाडण्यासाठी त्या घरोघरी जात आहेत का?,’ असा सवाल अजित पवारांनी विचारला होता.
‘आम्हा सगळ्या मुलांच्यामध्ये मी काकींच्या सगळ्यात जवळचा राहिलो आहे. कधीतरी त्यांना भेटल्यावर त्यांना मी हे विचारणार आहे की माझ्यात असं काय कमी होतं?,’ अशा शब्दांत अजित पवारांनी त्यांच्या भावना बोलून दाखवल्या होत्या. याबद्दल शरद पवारांना विचारण्यात आलं. त्यावर तुम्ही तुमचा विचार सोडला. इतक्या वर्षात तुमच्या ज्या विचारांशी नाते होते ते सोडले, त्याचं उत्तर त्यांना (अजित पवार) द्यावं लागलं, असं शरद पवार म्हणाले.