Amit Shah: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज महाराष्ट्र दौऱ्यावर आले होते. पण त्यांचा दौरा अचानक रद्द झाला आहे. त्यांच्या ४ सभा होणार होत्या. पण त्या रद्द करुन ते नागपूरहून दिल्लीला परतले आहेत.
लोकसभा निवडणुकीत भाजपला विदर्भात मोठा फटका बसला. विदर्भात पक्षाला केवळ २ जागा जिंकता आल्या होत्या. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत भाजपनं सर्वाधिक लक्ष विदर्भावर केंद्रित केलं आहे. त्याचाच भाग म्हणून भाजपनं विदर्भात आज शहांच्या चार सभांचं आयोजन केलं होतं. नागपूरमधील काटोल, सावनेरसह गडचिरोली, वर्ध्यात शहा घेणार होते. पण विदर्भ भाजपचे संघटन सचिव यांनी शहांच्या सगळ्या सभा रद्द झाल्याचं सांगितलं आहे.
सगळ्या सभा रद्द करुन शहा तातडीनं दिल्लीला परतले आहेत. मणिपूरमधील परिस्थिती चिघळल्यानं शहा दिल्लीला परत गेले आहेत. सीआरपीएफचे महासंचालक अनिश दयाळ यांना मणिपूरला पाठवण्यात आलं आहे. मणिपूरमध्ये हिंसाचार वाढला आहे. जिरीबाम आणि फेरजॉल जिल्ह्यातील इंटरनेट आणि मोबाईल डेटा आज बंद करण्यात आला आहे. सीआरपीएफच्या तळावर फुटिरतावाद्यांनी हल्ला केल्यानंतर राज्यात संघर्ष पेटला आहे. मैतेई आणि कुकी समुदायातील तणाव निर्माण झाला आहे.
शहांच्या अनुपस्थितीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडे पक्षानं सभांची जबाबदारी दिली आहे. केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान आणि माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्याकडे सभांना संबोधित करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. पक्षाच्या नेतृत्त्वाकडून याला दुजोरा देण्यात आला आहे. प्रशासकीय कामांमुळे शहांना अचानक दिल्लीला परतावं लागलं असल्याची माहिती देण्यात आलेली आहे.
राज्यातील प्रचारसभा उद्या थंडावणार आहेत. २० नोव्हेंरला राज्यात मतदान होणार आहे. त्यानंतर २३ तारखेला मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात येईल. राज्यात यंदा अभूतपूर्व परिस्थिती आहे. दोन आघाड्या, त्यात प्रत्येकी तीन पक्ष, त्यांच्यासोबत स्वबळावर लढणारी मनसे, वंचित, एमआयएम, परिवर्तन महाशक्ती अशी बहुरंगी लढत राज्यात यंदा होत आहे.