या गंभीर आजारी शिक्षकांची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी कन्नड ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ प्रविण पवार यांना पाचारण करण्यात आले. या वैद्यकीय तपासणीसाठी ३३ शिक्षक उपस्थित झाले.
गंभीर आजारी नसताना खोटी माहिती देणाऱ्या मुख्याध्यापक आणि शिक्षकांवर गुन्हे नोंदविण्याचे निर्देश सहायक निवडणूक अधिकारी विद्याचरण कडवकर यांनी दिले. या संदर्भात अधिक माहिती देताना सहायक निवडणूक निर्णय अधिकारी विद्याचरण कडवकर यांनी सांगितले. ‘विधानसभा निवडणुकीत काम करण्यासाठी तालुक्यातील शाळांकडून शिक्षक कर्मचाऱ्यांची मागणी करण्यात आली होती. संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी या कर्मचाऱ्यांची माहिती ऑनलाइन मागितली होती. मुख्याध्यापकांनी ६२ शिक्षक गंभीर आजाराने ग्रस्त असून, निवडणूक कामात काम करू शकत नसल्याचे कळवले. याची गंभीर दखल घेऊन या गंभीर आजारी शिक्षकांची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी कन्नड ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ प्रविण पवार यांना पाचारण करण्यात आले. या वैद्यकीय तपासणीसाठी ३३ शिक्षक उपस्थित झाले.
त्यातील पाच शिक्षक वगळता इतर सर्व शिक्षक ठणठणीत असल्याचा निर्वाळा वैद्यकीय अधिकारी अधीक्षक डॉक्टर प्रवीण पवार यांनी दिला. या संदर्भात बोलताना डॉक्टर पवार म्हणाले. ‘यातील अनेक शिक्षक कर्मचाऱ्यांनी जुने वैद्यकीय सर्टिफिकेट जोडून आपण आजारी असल्याचे दाखवले. हृदयविकार, मधुमेह, मणक्यात गॅप, सद्यस्थिती ठीक नाही, उभे राहता येत नाही अशी साधारण कारणे निवडणूक कामे टाळण्यासाठी पुढे करण्यात आली होती.’ ‘हे कर्मचारी दैनंदिन काम करण्यास सक्षम नाहीत का, या संदर्भात या कर्मचाऱ्यांना वैद्यकीय बोर्डाकडे पाठविण्यात येणार आहे,’ असेही ते म्हणाले.
या संदर्भात निवडणूक निर्णय अधिकारी विद्याचरण कडवकर यांनी सांगितले, ‘वैद्यकीय तपासणी व पडताळणीस तीस शिक्षक अनुपस्थित राहिले. त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे; तसेच गंभीर आजारी असल्याची खोटी माहिती सादर करणाऱ्या मुख्याध्यापकांवरही गुन्हे नोंदवण्यात येत आहेत.’ या कारवाईमुळे शिक्षकांचे धाबे दणाणले आहे.