Ajit Pawar In Baramati: विधासनभा निवडणुकीत सर्वाधिक चर्चेत असलेल्या बारामती विधानसभा मतदारसंघातील सांगता सभेत अजित पवारांनी विकास कामावर अधिक फोकस ठेवला. त्याच बरोबर घरच्या मैदानावर शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करण्याचे टाळले.
माझ्या विरोधात घरातील कोणी उभे राहिले तर तो त्यांचा अधिकार आहे. प्रतिभा काकी (शरद पवार यांच्या पत्नी) मला आईसारख्या आहेत. पण त्यांना टेक्सटाईल पार्कमध्ये जाण्यापासून रोखल्याच्या बातम्या पसरवल्या जातात. माझा विरोधक असला तरी मी त्याचे काम मार्गी लावतो. मग घरातल्यांबाबत असे होईल का. इतक्या खालच्या पातळीवर जावून सहानुभूती मिळवू नका. बारामतीतील मिशन हायस्कूल मैदानावर महायुतीचे उमेदवार अजित पवार यांची सांगता सभा पार पडली.
अजित पवारांनी उमेदवार युगेंद्र यांच्यावर चौफेर हल्ला करताना शरद पवार, खा. सुप्रिया सुळे यांच्यावर थेट टीका करणे टाळले. विरोधक भावनिक करतात. त्यांना सडेतोड उत्तर द्या.कोणाला घाबरण्याचे कारण नाही. फक्त आपल्याकडून काही चूक होवू देवू नका. तुमच्यावर कोणी दबाव आणत असेल तर अजित पवार तुमच्या पाठीशी आहे, असे देखील अजितदादा म्हणाले.
१९६७ ते १९९० या काळात येथे शरद पवार नेतृत्व करत होते. त्यानंतर मी नेतृत्व करू लागलो. परंतु साहेबांच्या, माझ्या काळात कधीही लोक पैसे देवून आणावी लागली नाहीत. पण आता सभेला आणलेल्या महिला टीव्हीसमोर आम्हाला पैसे दिले नाहीत, चहा-पाणी नाही, असे सांगत आहेत. ५०० रुपये देवून महिला आणल्या जात आहेत. ही पद्धत बारामतीत कधी नव्हती. या सवयी झेपणाऱ्या नाहीत. तुम्हाला नादच करायचा असला तर मग मी पण पुरून उरेन. मी निवडणूकीचे कधीही टेन्शन घेतले नव्हते. फक्त १९९९ साली चंद्रराव तावरे माझ्या विरोधात उभे असताना मी दबकत होतो. पण तेव्हाही मी ५० हजारांहून अधिक मतांनी विजयी झालो. आताच्या निवडणूकीत गाव नेत्यांचा राग माझ्यावर काढू नका. तालुका पातळीवरील नेत्यांच्याही काही चूका झाल्या आहेत त्या मी दुरुस्त करतो, असे ही ते म्हणाले.
भावनिक होवू नका, कामाच्या माणसाच्या मागे उभे रहा. बारामतीत दादागिरी, गुंडगिरी, दहशत खपवून घेतली जाणार आहे. कोणी कितीही मोठ्या बापाचा असो, चुकला तर त्याच्यावर मोक्का लागेल. अजित पवारला मत म्हणजे भाजपला मत असा प्रचार काहींकडून केला जात आहे. मला मत म्हणजे ते राष्ट्रवादीला पर्यायाने महायुतीला मत असेल, असे स्पष्ट करून अजित पवार म्हणाले, तुम्ही शिवसेनेसोबत जायचा निर्णय घेतला होताच ना. लोकसभेला तुम्ही मला झटका दिला. लोकसभेला ताई व विधानसभेला दादा असे तुम्ही ठरवले होतेच. आता विरोधक म्हणतात घरात चार मते असतील तर तिकडे दोन द्या, इकडे दोन द्या. तसे अजिबात करू नका. तुम्ही जेवढे अधिकचे मताधिक्य द्याल तेवढा जास्त निधी मी बारामतीला देईल, असे अजितदादांनी सांगितले.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या सांगता सभेत अजित पवारांनी झालेल्या विकास कामाची यादीच वाचून दाखवली. तसेच भविष्यात काय काय करणार हे देखील सांगितले. शिल्लक कामे होण्यासाठी २० तारखेला माझ्या मनातील गोष्ट तुम्ही करा असे आवाहन अजित पवारांनी केले.