Anil Deshmukh News: राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची सांगता झाल्यानंतर एक मोठी बातमी समोर येत आहे. राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अनिल देशमुख गाडीवर काही अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला असून त्यात ते जखमी झाले आहेत.
काटोल मतदारसंघातील निवडणूक अटीतटीची बनत चालली आहे. अनिल देशमुख हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शप) उमदेवार सलील देशमुख यांच्या प्रचारासाठी सोमवारी नरखेड येथे गेले होते. येथील सभा आटोपून देशमुख हे कारने परत काटोलकडे यायला निघाले. जलालखेडा मार्गावरील बेलफाट्याजवळील गतीरोधकावर, त्यांच्या कारची गती कमी झाली. त्याचा फायदा घेत, तोंडाला कापड बांधलेले तीन चार जण तेथे आले. त्यांनी कारवर दगडफेक केली. यात देशमुख यांच्या डोक्याला मार लागला. हा हल्ला होताच, देशमुख यांच्या कारमागे असलेल्या अन्य कारमधील कार्यकर्ते कारमधून बाहेर आले. त्यांना बघताच दगडफेक करणारे शेतातून पसार झाले.
जखमी देशमुख यांना काटोलमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच काटोल पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पोलिसांनी माहिती घेत दगडफेक करणाऱ्यांचा शोध सुरू केला.
खासदार सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया
ज्यांनी कोणी अनिल देशमुख यांच्यावर हल्ला केला त्यांना तातडीने अटक केली पाहिजे. नाही तर मी स्वत: रस्त्यावर उतरून आंदोलन करेन असा इशारा सुप्रिया सुळे यांनी दिला आहे.
राज्यात कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत. लोकशाहीचे धिंडवडे उडवले जात आहेत. याचे उदाहरण आज निवडणुकीच्या सांगता सभेवरून घरी परतताना राज्याचे माजी गृहमंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्यातून समोर आले. या घटनेचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात येत आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून देण्यात आली आहे.
दरम्यान भाजपने अनिल देशमुख यांनी केलेले आरोप फेटाळून लावले आहेत. पराभव निश्चित आहे म्हणून सहानभूती मिळावी यासाठी हा स्टंट केला आहे. स्वत:च्या कार्यकर्त्यांकडून त्यांनी हा हल्ला केला आणि आता पट्या बांधून फिरत आहेत. जर त्यांची प्रकृती इतकी गंभीर असेल तर त्यांनी सर्वात आधी मुंबई किंवा नागपूर येथील रुग्णालयात जाऊन उपचार घेण्याची गरज आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांवर त्यांनी जो आरोप केला आहे तो चुकीचा आहे. सर्व कार्यकर्ते बुथ नियोजनात होता, असे भाजपने म्हटले आहे.