Ajit Pawar: बारामतीत झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या सांगता सभेत अजित पवारांच्या आई आशाताई देखील उपस्थित होत्या. या सभेत त्यांचा संदेश देखील वाचून दाखवण्यात आला. पाहा त्या काय म्हणाल्या.
अजित पवारांनी भाषणात शरद पवार अथवा सुप्रिया सुळे यांच्यावर थेट टीका करण्याचे टाळले. आपल्याला एकटे पाडण्याचे प्रयत्न झाले. पण आता आईसह बहिण, मुले, पत्नी सर्वजण माझ्यासोबत आहेत. बारामतीकर हेच माझे कुटुंब असल्याचे अजित दादांनी सांगितले. या सभेत अजित दादांच्या आई आशाताई देखील उपस्थित होतो. त्या व्यासपीठावर न बसता. समोर बसल्या होत्या. सभेत त्यांनी लिहलेला संदेश वाचून दाखवण्यात आला. ज्यात त्यांनी अजित पवार लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी धडपडतात, ते मनात काहीही न ठेवता स्पष्ट बोलतात असे म्हटले आहे. तसेच आज अजित एकटा पडला आहे याचे दु:ख वाटत असल्याचे आशाताई यांनी या संदेशात म्हटले आहे.
मुलासाठी काय संदेश दिला आईने…
खरं तर मी काही येथे बोलण्यासाठी आले नाही. मला तेवढं बोलता पण येत नाही. एक आई म्हणून मला एक गोष्ट मात्र मला तुम्हाला अजितच्या बाबतीत सांगायची आहे की अजित लोकांचे प्रश्न, अडचणी सोडवणे साठीच धडपडत असतो. लोकांचे प्रश्न सोडवण्या शिवाय त्याला चैन पडत नाही. त्यासाठी मनामध्ये काही न ठेवता स्पष्टपणे बोलत असतो. पण आज दुःख या गोष्टीच वाटत आज की, येवढ करूनही अजित एकटा पडला आहे. त्याला हरवण्यासाठी घरातलेच लोक त्याच्या मागे लागले आहेत. अजित कसा चुकलाय हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण मला माहिती आहे की अजितवर काय अन्याय झालाय, पण तो काय सोसतोय हे मलाच माहिती आहे. आजही कुटुंबासाठी तो काही गोष्टी बोलत नाही, पण स्वतः मात्र सगळं सहन करतोय. एवढं मोठं मन त्याचं आहे, तुम्ही बारामतीकरांनी त्याच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे एवढीच तुम्हाला विनती.