Nanded Lok Sabha and Vidhan Sabha Election Voting : नांदेडमध्ये २५ वर्षांनी एकाचवेळी लोकसभेसाठी आणि विधानसभेसाठी मतदान होणार आहे. या निवडणुकीत अनेकांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
जिल्ह्यात नांदेड उत्तर, नांदेड दक्षिण, भोकर, हदगाव, किनवट, लोहा, नायगाव, मुखेड आणि देगलूर असे नऊ विधानसभा मतदार क्षेत्र आहेत. लोकसभा मतदार क्षेत्रात लोहा, हदगाव आणि किनवट वगळता इतर सहा तालुक्यांचा समावेश आहे.
खासदारांच्या निधनानंतर लोकसभा पोटनिवडणूक होणार
खासदार वसंत चव्हाण यांच्या अकाली निधनाने नांदेड लोकसभेची जागा रिक्त झाली होती. निवडणूक आयोगाने विधानसभेसोबतच नांदेड लोकसभेची पोटनिवडणूक देखील जाहीर केली. लोकसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसने दिवंगत खासदार वसंत चव्हाण यांचे सुपुत्र रविंद्र चव्हाण यांना मैदानात उतरवले आहे, तर भाजपकडून संतुक हंबर्डे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या दोन्ही उमेदवारांसाठी ही पहिली निवडणूक आहे.
९ विधानसभा मतदारसंघात चुरशीची लढत
दुसरीकडे नऊ विधानसभा मतदार क्षेत्रात महायुती आणि महाविकास आघाडीचे उमेदवार आपले भाग्य आजमावत आहेत. अनेक मतदार क्षेत्रात दुहेरी आणि तिरंगी लढत पाहायला मिळत आहे. जिल्ह्यातील भोकर आणि लोहा मतदार क्षेतत्राकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.
भोकरमध्ये माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची कन्या श्रीजया चव्हाण निवडणुकीच्या मैदानात आहेत. दुसरीकडे लोहा मतदारसंघात माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर आणि आशाताई शिंदे या सख्ख्ये बहीण भाऊ आमने सामने आहेत. त्यामुळे अशोक चव्हाण आणि प्रताप पाटील चिखलीकर यांच्यासाठी प्रतिष्ठेची आणि अस्तित्वाची लढाई आहे.
नांदेडमध्ये २५ वर्षानंतर एकाचवेळी लोकसभा आणि विधानसभेसाठी मतदान, चुरशीच्या लढतीत कोण ठरणार किंग?
नांदेडमध्ये या दिग्गज नेत्यांची झाली सभा
नांदेडमध्ये लोकसभा पोटनिवडणूक आणि विधानसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीच्या केंद्र आणि राज्य पातळीवरील नेत्यांच्या सभा पार पडल्या. महायुतीच्या उमेदवारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री ज्योतीरादित्य सिंधीया, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, श्रीकांत शिंदे, पंकजा मुंडे, अशोक चव्हाण, रुपाली चाकणकर, आंध्रप्रदेश राज्याचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांच्यासह इतर नेत्यांच्या सभा पार पडल्या.
दुसरीकडे महाविकास आघाडीकडून काँग्रेस नेते राहुल गांधी, तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, अमित देशमुख, खासदार इम्रानप्रताप गढी यांनी जाहीर सभा घेतली. शिवाय वंचित नेते बाळासाहेब आंबेडकर यांची सभा देखील पार पडली.