Ajit Pawar: महायुतीला बहुमत मिळाल्यावर राज्यपालांकडे जे पत्र देण्यात येईल, त्यावर नवाब मलिकांची स्वाक्षरी नसेल, अशी भूमिका मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी घेतली. त्यावर आता अजित पवारांनी त्यांची भूमिका मांडली आहे.
‘मागच्या काळात नवाब मलिक यांच्यावर काही आरोप झाले. त्यानंतर पुढे काय घडलं ते तुम्हाला माहितीय. आरोप झाले असतील, तर चौकशी होऊन तो आरोप सिद्ध व्हावा लागतो. मग तो व्यक्ती दोषी ठरतो. तोपर्यंत त्याला दोषी म्हणता येत नाही. अलीकडच्या काळात राजकीय जीवनात काम करताना बिनबुडाचे आरोप केले जातात. मी नवाब मलिकांना खूप जवळून ओळखतो. आधी ते समाजवादी पक्षात होते. तेव्हापासून मी त्यांना मुंबईच्या राजकारणात पाहतोय. त्यांचे असे काही कोणाशी संबंध असतील असं मला वाटत नाही. बऱ्याच जणांवर असे आरोप झाले. पण आरोप सिद्ध झालेला नसताना त्यांना तिकीट देऊ नका, ही भूमिका मला पटत नाही,’ असं पवारांनी म्हटलं.
भाजपच्या भूमिकेवरही पवार सविस्तर बोलले. ‘आरोप त्यांनी केले असल्यानं त्यांचं म्हणणं होतं की मलिकांना तिकीट देऊ नका. पण मी तिकीट दिलं. मग त्यांनी म्हटलं, आम्ही तिथे दुसरा उमेदवार उभा करु. आम्ही मलिकांच्या प्रचाराला जाणार नाही. मी म्हटलं, ठीक आहे. हरकत नाही. २८८ पैकी एक-दोन ठिकाणी असं झालं तर चालू शकतं. आपण आपल्या नेत्यांच्या, कार्यकर्त्यांच्या पाठिशी उभं राहिलं पाहिजे, ही माझी भूमिका आहे,’ असं अजित पवार म्हणाले.
सरकार स्थापनेसाठी मलिकांचा पाठिंबा घेणार नाही. राज्यपालांकडे जाणाऱ्या पत्रात मलिकांची सहीच नसेल. आम्हाला त्यांचा पाठिंबाच नको, अशी भूमिका भाजप नेते आशिष शेलारांनी मांडली होती. त्यावेळी ते अतिशय तावातावानं बोलत होते. त्यावरही अजित पवारांनी भाष्य केलं. ‘राज्यपालांकडे दिल्या जाणाऱ्या पत्रात मलिकांची सही नसतेच. महायुतीचे जितके आमदार निवडून येतील, त्यातून नेता निवडला जाईल. जसं आता लोकसभा निवडणुकीनंतर घडलं. आम्ही सगळे नेते बसलो. आम्ही एकमतानं मोदी साहेबांचं नाव निश्चित केलं आणि मग आम्ही ते पत्र तयार केलं. त्या पत्रावर सगळ्यांच्या सह्या घेतल्या. सगळ्यांच्या म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेसमधून माझी, टीडीपीमधून चंद्राबाबू नायडूंची, जेडीयूकडून नितीश कुमार यांची सही पत्रावर होती. अशा सह्यांचं पत्र घेऊन आम्ही राष्ट्रपतींना भेटलो. त्यामुळे असा प्रश्न महाराष्ट्रात असेल तेव्हा विधानसभेतील विधिमंडळ पक्षाच्या नेत्याची तिथे सही असते,’ अशा शब्दांत पवारांनी नियम सांगितला.