मी पहिल्या टर्मला फक्त आमदार, दुसऱ्या टर्मपासून मंत्री, आता रोहित पवारांना संधी दिली तर… नातवासाठी पवारांची साद

Sharad Pawar Statement on Rohit Pawar Political Career: रोहित पवारांना दुसऱ्या टर्मसाठी विधानसभेत पाठविणे तुमच्या हातात आहे, तर तेथे त्याचे पुढे काय करायचे हे माझ्या हातात आहे, असे शरद पवार म्हणाले आहेत.

महाराष्ट्र टाइम्स

अहिल्यानगर : मी १९६७ मध्ये आमदार झालो. पहिली पाच वर्षे आमदारच होतो. दुसऱ्या टर्मला राज्यमंत्री झालो. तिसऱ्या टर्मला मंत्री, चौथ्या टर्मला मुख्यमंत्री आणि पुढे केंद्रात मंत्री. रोहित पवार यांचीही आता पहिली टर्म संपली आहे. त्याला दुसऱ्या टर्मसाठी विधानसभेत पाठविणे तुमच्या हातात आहे, तर तेथे त्याचे पुढे काय करायचे हे माझ्या हातात आहे, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपले नातू आमदार रोहित पवार यांच्या राजकीय कारकीर्दीचा प्रवास कसा असेल, याचे संकेत दिले आहे.

कर्जत-जामखेड मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार रोहित पवार यांच्या प्रचारासाठी पवार यांनी आज कर्जतमध्ये सभा घेतली. त्यावेळी ते बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र फाळके, अहिल्यादेवी होळकर यांच्या घराण्यातील वंशज भूषणसिंह होळकर, बाळासाहेब साळुंके, उषा राऊत यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

यावेळी बोलताना पवार यांनी केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार, राज्यातील महायुतीचे सरकार आणि पवार यांच्या विरोधातील महायुतीचे उमेदवार राम शिंदे यांच्यावरही जोरदार टीका केली. पवार म्हणाले, २०१४ च्या निवडणुकीच्यावेळी मोदींनी प्रत्येकाच्या खात्यात पंधरा लाख रुपये जमा करण्याची घोषणा केली होती. प्रत्यक्षात ते झाले नाहीत. आता त्यांच्याच नेतृत्वाखालील सरकारने लाडकी बहीण योजना आणली आहे. मात्र, लबाडा घरचे आवतान काही खरे नसते. निवडणूक झाली की ते ही योजना बंद करतील. वास्तविक महिलांना सुरक्षा हवी आहे. गेल्या काळात ६७ हजार महिलांच्या अत्याचाराच्या तक्रारी आल्या आहेत. ६४ हजार महिला बेपत्ता आहेत. यावरून महिला सुरक्षेची स्थिती लक्षात येते. ६२ लाख तरुणांना नोकऱ्या नाहीत. यावरून बेरोजगारीची स्थिती स्पष्ट होते. २० हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, यावरून शेतकऱ्यांची परिस्थिती दिसून येते. असे असताना भाजपच्या सरकारने उद्योजकांचे १८ हजार कोटींचे कर्ज माफ केले आहे. शेतकऱ्यांकडे मात्र दुर्लक्ष केले आहे, असा आरोप पवार यांनी केला.
Sanjana Jadhav : लग्नानंतर महिन्याभरात माहेरी आले, बाबा म्हणाले तुला मूल होऊदे मग… संजना जाधव ढसाढसा रडल्या
विरोधी उमेदवार राम शिंदे यांच्यावर नाव न घेता पवारांनी टीका केली. ते म्हणाले, पूर्वी दहा वर्षे असलेल्या लोकप्रतिनिधीने काहीच विकास केला नाही. मग त्यांनी काय केले? असा प्रश्न पडतो. एकदा मी चौंडीला गेले होतो. तर तेथे एक अलीशान बंगला पाहिला. मला प्रश्न पडला की या दुष्काळी भागात एवढा खर्च करून बंगला कोणी बांधला? तुम्हाला याचे उत्तर माहिती असेलच. यावरून त्यांनी नेमका कोणाचा विकास केला, हे लक्षात येते, असेही पवार म्हणाले.

पुढील योजना सांगताना पवार म्हणाले, आम्ही पुणे जिल्ह्यात केवळ शहर नाही तर ग्रामीण भागातही उद्योग उभारून विकासाला चालना दिली आहे. तसाच प्रयत्न नगर जिल्ह्यात करायचे आहेत. त्यासाठी तुम्ही रोहित पवार यांना निवडून द्या, पुढची जबाबदारी आम्ही घेतो. रोहित पवार यांची पहिला टर्म आता पूर्ण झाली आहे. माझा प्रवास असाच होता. पहिली पाच वर्षे मी आमदार होतो. दुसऱ्यावेळी राज्यमंत्री झाला, तिसऱ्यावेळी मंत्री, चौथ्यावेळी मुख्यमंत्री आणि नंतर केंद्रीय मंत्री झालो. असा माझा प्रवास आहे. मलाही पहिल्या वर्षी काहीच पदे मिळाली नव्हती. दुसऱ्या टर्मपासून ती मिळायला लागली. आता रोहित पवार यांची दुसरी टर्म तुमच्या हातात आहे. त्याला विधानसभेत पाठवा, पुढे त्याचे काय करायचे ते माझ्या हातात आहे, असेही पवार म्हणाले.

मी पहिल्या टर्मला फक्त आमदार, दुसऱ्या टर्मपासून मंत्री, आता रोहित पवारांना संधी दिली तर… नातवासाठी पवारांची साद

यावेळी बोलताना रोहित पवार यांनी त्यांना सोडून गेलेल्या पदाधिकाऱ्यांवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, राज्यातील काही जण वेगळ्या फायद्यासाठी गुवाहाटीला गेले होते, तसेच आपल्या मतदारसंघातील काही जण तिकडे गेले आहेत. मात्र, त्यांच्या जाण्यामुळे लोकांचाच फायदा आहे. मी जेव्हा तुमची सेवा करायचो, तेव्हा हेच लोक मला अडवायचे. माझे काम तुमच्यापर्यंत पोहचू नये, असाच त्यांचा प्रयत्न असायचा. आता हा अडथळा दूर झाला आहे. ते गेले असले तर खरे निष्ठावंत आपल्यासोबत आहेत. सोडून गेलेल्या धूळ चारायची आहे आणि या मतदारसंघाचा बिहार होण्यापासून वाचवायचा आहे, असेही रोहित पवार म्हणाले.

लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड…. आणखी वाचा

Source link

Karjat Jamkhed Vidhan SabhaMaharashtra vidhan sabha nivadnukncp sharad pawarRohit Pawarsharad pawar karjat speechकर्जत जामखेड विधानसभेतील भाषणरोहित पवारांसाठी पवारांचा प्रचारविधानसभा निवडणुकीच्या घडामोडीशरद पवारांची राष्ट्रवादीशरद पवारांचे कर्जतमधील भाषण
Comments (0)
Add Comment