Maharashtra Election 2024: राज्यातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या मतदारसंघापैकी एक बारामतीत पैसे वाटपाच्या तक्रारीनंतर आयोगाने युगेंद्र पवार यांच्या शरयू टोयोटा आणि अजित पवारांच्या निकटवर्तीय असलेल्या गुजर यांच्या नटराज नाट्यमंदिरावर छापे टाकण्यात आले.
बारामतीत पहिल्यांदाच ग्रामपंचायतच्या पातळी सारखी निवडणूक सुरू असून, गावागावात व गटगटात ही निवडणूक विभागली गेली आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीवर पक्षीय कार्यकर्त्यांचे व नेत्यांचे व्यक्तिगत लक्ष आहे. त्यातून ही निवडणूक जास्त चुरशीची बनली आहे. त्यातून पैसे वाटपाच्या तक्रारी सुरू झाल्या आहेत. लोकसभेनंतर विधानसभेच्या निवडणुकीतही पैसे वाटप होत असल्याच्या तक्रारी आल्याने निवडणूक आयोगाच्या पथकाने लक्ष ठेवले आहे.
काल रात्री युगेंद्र पवार यांच्या शरयू टोयोटा या शोरूम मधील कार्यालयावर निवडणूक आयोगाच्या पथकाने तपासणी केली. मात्र यामध्ये काहीही आढळून आले नसल्याची माहिती प्रांताधिकारी वैभव नावडकर यांनी दिली आहे. दरम्यान नावडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार अजित पवार यांचे निकटवर्तीय असलेल्या किरण गुजर यांच्या अध्यक्षते खालील नटराज नाट्यमंदिर या संस्थेवर ही निवडणूक आयोगाच्या पथकाने तपासणी केली होती. तिथे ही काही आढळले नसल्याची माहिती नावडकर यांनी दिली आहे. एकूणच बारामती मध्ये पहिल्यांदाच निवडणुकीच्या काळात पैसे वाटपा वरून कार्यालयांची झाडझडती होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
दुसरीकडे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यावर पैसे वाटल्याचा आरोप करण्यात आला आहे. बहुजन विकास आघाडीने विराहमधील हॉटेल विवांतमध्ये मोठा राडा घातला. येथून १० लाखांची रोख रक्कम मिळाली आहे. तसेच अनेक डायऱ्या देखील सापडल्या असून ज्यात नोंदी देखील आहेत. या प्रकरणी स्वत: विनोद तावडे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. आपण बुथ कार्यकर्त्यांना सूचना देण्यासाठी गेलो होतो.तेव्हा अप्पा ठाकूर आणि क्षितिज यांना वाटले आम्ही पैसे वाटत आहोत. या प्रकरणाची निवडणूक आयोग आणि पोलिसांनी चौकशी करावी असे तावडे यांनी म्हटले आहे.