विधानसभा निवडणुकीच्या आदल्या दिवशी भाजप नेते विनोद तावडे वादात सापडले आहेत. विरारमधील एका हॉटेलमध्ये त्यांच्यावर पाच कोटी रुपये वाटल्याचा आरोप झाला. हॉटेलमधील एका रूममधून नऊ लाख रुपये रोख जप्त करण्यात आली आहे. हितेंद्र ठाकूर यांनी तावडेंवर गंभीर आरोप केले असून भाजपमधीलच एका मित्राने टीप दिल्याचा दावा केला आहे. या प्रकरणावरून महाविकास आघाडीने भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे.
विनोद तावडे यांनी त्यांच्यावरील पैसे वाटल्याचे आरोप फेटाळून लावले आहेत. मात्र आता तावडेंवर आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र हितेंद्र ठाकूर यांनी सर्वात मोठा बॉम्ब टाकला तो म्हणजे भाजपमधील एका मित्रानेच टीप दिल्याचं म्हटलंय. त्यामुळे आता तावडेंचा ठरवून गेम केल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. अशातच याचाच धागा पकडत ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी थेट फडणवीस यांचे नाव घेतले आहे.
भाजपच्या नोट जिहादने तावडेंच्या आयुष्याचा भयंकर विनोद झाला. पुन्हा एकदा मराठा नेतृत्व संपवलं, देवेंद्रजी खुश तो बहुत होंगे आप..? असा सवाल करत सुषमा अंधारे यांनी फडणवीसांनी डिवचलं. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या प्रकरणावरून भाजप नेत्यांवर धारेवर धरलं आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी यावर बोलताना, गृहखात्याने त्यांच्यावर पाळत ठेवली होती. विनोद तावडे यांचे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याशी चांगले संबंध असल्याने भविष्यात ते डोईजड होतील या भीतीमधूनच ही कारवाई करण्यात आली. त्यांना या प्रकरणामध्ये पद्धतशीरपणे अडकवण्यात आलं आहे. एका बहुजन नेत्याला संपवण्यासाठी हा प्रकार घडवून आणल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
काँग्रेस नेत रमेश चेन्नीथला यांनी विनोद तावडे यांना अटक करण्याची मागणी केली आहे. भाजपने आपला पराभव मान्य केला असल्याने ते आता पैसे वाटत असल्याचं चेन्नीथला यांनी म्हटलं आहे. मात्र विनोद तावडे यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले असून आचारसंहितेचं पालन होत आहे की नाही हे पाहण्यासाठी आपण गेलो असल्याचं तावडे म्हणाले.