Maharashtra Election 2024: राज्यातील विविध ठिकाणी मतदानाच्या आधी पैसे वाटपाच्या बातम्या समोर येत असताना रोहित पवार यांच्या मतदारसंघात बारामती अँग्रो साखर कारखान्याचे कृषी अधिकाऱ्याकडे पैसे आणि याद्या सापडल्याचा दावा भाजप केला आहे.
जामखेड तालुक्यातील नान्नज येथे सरपंच आणि ग्रामस्थांनी या व्यक्तीला पकडले. बारामती अँग्रो साखर कारखान्याचे कृषी अधिकारी असल्याचे त्या अधिकाऱ्याने सांगितले आहे. त्यांच्याकडे पैसे, नावांची यादी आढळून आली. कार्यकर्त्यांनी त्यांचे व्हिडिओ केले आणि नंतर पोलिसांच्या ताब्यात दिले. उमेदवार रोहित पवार यांच्यासाठी हा अधिकारी पैसे वाटप करीत असल्याचा आरोप भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी केला.
त्यानंतर पवार यांनी फेसबुक लाइव्हच्या माध्यानातून याचे स्पष्टीकरण दिले. आपल्या कारखान्याचे कृषी अधिकारी कारखान्याशी संबंधित कामाचे पैसे देण्यासाठी जात होते. मात्र, भाजपच्या कार्यकर्त्यांनी जाणीवपूर्वक त्यांना यात अडकविले आहे. त्यांना मारहाण करून खोटी कबुली घेतली. हे कृत्य करणारे कार्यकर्ते भाजपचे उमेदवार राम शिंदे यांच्या जवळचे आहेत. त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत.
कारखान्याचे कृषी अधिकारी मोहीते यांना गावकऱ्यांनी पकडले. गावकऱ्यांनीची त्यांची झडती घेतली. त्याचे व्हिडिओ करण्यात आले. त्यावेळी मोहिते यांच्याकडे १ लाख रूपयांची रोकड आढळून आल्याचे सांगण्यात आले. त्यांच्यासोबत एक हस्तलिखित चिठ्ठी मिळाली. त्यामध्ये वेगवेगळ्या गावात ६० लाख रूपये वाटपाचा नावांसहीत हिशोब लिहलेला असल्याचे दिसून आले. त्यानंतर कार्यकर्त्यांनी पोलिसांना बोलाविले. त्यांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. मोहिते ज्या वाहनातून फिरत होते, ते वाहनही पोलिस घेऊन गेले. पोलिसांकडून अधिक चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात आले.
या घटनेचे व्हिडिओ व्हायरल झाले. भाजपनेही यासंबंधी एक्सवर पोस्ट केली आहे. त्यामध्ये म्हटले आहे, कर्जत जामखेड मतदारसंघात रोहित पवार यांच्या बारामती अग्रो कंपनीचे अधिकारी पैसे वाटत असल्याचं उघड झालं आहे. या अधिकाऱ्यांकडे दारूसाठी किती पैसे आणि कुणाला द्यायचे किती याचा तपशील आहे. मतदारांची यादी आणि पैशांचं घबाडही सापडलं आहे. निवडणूक आयोगानं यावर त्वरीत कारवाई करावी आणि सुप्रिया सुळे यांनी याप्रकरणी मूग गिळून गप्प बसू नये, असेह भाजपने म्हटले आहे.
कर्जत जामखेड मधील कारवाईत केवळ ४७ हजार रुपये आढळून आल्याचे प्रशासनाने सांगितले. जयश्रीराम साखर कारखान्याचे कृषी अधिकारी मधुकर मोहिते यांना तब्यात घेतल्याचे निवडणूक अधिकारी नितीन पाटील यांनी सांगितले.