Kolhapur Voting News : कोल्हापुरात मतदानासाठी मोठी तयारी करण्यात आली असून १८ हजार कर्माचारी आणि ८ हजार पोलीस तैनात करण्यात आले आहेत.
जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघातून एकूण १२१ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. जिल्ह्यातील ३ हजार ४५२ मतदान केंद्रांवर मतदान होणार असून याकरता १८ हजार ४८० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मंगळवारी करवीर विधानसभेसाठी रमणमळा येथील शासकीय धान्य गोदामात सकाळी निवडणूक निरिक्षक यांच्या उपस्थितीत निवडणूक कर्मचाऱ्यांना साहित्याचे वाटप करण्यात आलं. यानंतर राज्य परिवहन मंडळाच्या बस आणि खासगी वाहनातून कर्मचारी मतदान केंद्रांकडे रवाना झाले.
जिल्ह्यातील १० मतदारासंघात ३३ लाख ५ हजार ९८ इतके मतदार आहेत. यापैकी ८५ वर्षांवरील वयोवृध्द मतदार आणि दिव्यांग मतदारांनी होम वोटिंगद्वारे आणि निवडणूक कामासाठी नियुक्ती असलेले शासकीय कर्मचारी आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी असे टपाली मतदानाद्वारे मतदानाचा हक्क बजावलेले मतदार वगळता सुमारे ३२ लाखांवर मतदार बुधवारी मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
१२१ उमेदवार निवडणूक रिंगणात
जिल्ह्यात १० मतदारसंघातून एकूण १२१ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यापैकी सर्वाधिक उमेदवार चंदगड मतदार संघात १७ इतके आहेत. सर्वात कमी उमेदवार राधानगरीत ७ इतके आहेत. कागल, करवीर, कोल्हापूर उत्तर आणि कोल्हापूर दक्षिण मध्ये प्रत्येकी ११, शाहूवाडीत १४, हातकणंगलेत १६, इचलकरंजीत १३, तर शिरोळमध्ये १० उमेदवार नशीब आजमावत आहेत.
Kolhapur News : कोल्हापुरात मतदानासाठी १८ हजार कर्मचारी, तर ८ हजार पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचा खडा पहारा
असा असणार पोलीस बंदोबस्त
जिल्हा पोलीस दलातील ३ हजार ३०० पोलीस कर्मचारी, ४००० होमगार्ड, ६ पॅरा मिलिटरी कंपनी, ४ रिझर्व्ह पोलीस कंपनी जिल्ह्यात निवडणूक प्रक्रियेच्या पोलीस बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत. मतदानावेळी कायदा सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न उद्भवू नये यासाठी राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या ही जिल्ह्यातील दहा संवेदनशील मतदान केंद्रांवर तैनात करण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिली.