Vinod Tawde On Rahul Gandhi : राहुल गांधी यांनी विनोद तावडेंच्या नालासोपारा प्रकरणावरुन निशाणा साधला. राहुल गांधींनी केलेल्या ट्विटवर विनोद तावडे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
‘मोदीजी, हे ५ कोटी कोणत्या सेफमधून निघाले आहेत? जनतेचा पैसे लुटून तुम्हाला कोणी टेम्पोमध्ये पाठवला?’, असा सवाल राहुल गांधी यांनी काँग्रेसने त्यांच्या एक्स अकाऊंटवर शेअर केलेल्या व्हिडिओवर केला आहे.
राहुल गांधी यांच्या याच प्रश्नावर विनोद तावडे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांनी एक्सवर लिहिलंय, ‘राहुल गांधीजी, तुम्ही स्वत: नालासोपाऱ्यात या, हॉटेलचं सीसीटीव्ही फुटेज पाहा, तिथल्या निवडणूक आयोगाची संपूर्ण कार्यवाही बघा आणि हे सिद्ध करा, की अशाचप्रकारे पैसे आले आहेत. कोणतीही माहिती नसतानाचा अशा प्रकारचं वक्तव्य करणं हा बालिशपणा नाही तर काय?’, असं म्हणत त्यांनी प्रश्न विचारला आहे.
काँग्रेस आणि बहुजन विकास आघाडीने विनोद तावडेंवर मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप केला आहे. काँग्रेसने एक्सवर एक पोस्ट केली आहे. त्या पोस्टमध्ये लिहिलंय, ‘भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांना महाराष्ट्रातील एका हॉटेलमध्ये पैसे वाटताना पकडलं गेलं आहे. विनोद तावडे बॅग भरुन पैसे घेऊन गेले होते आणि तिथे ते लोकांना बोलावून पैसे वाटत होते. याची माहिती जनतेला मिळाल्यानंतर मोठा राडा झाला. पैशांसोबत विनोद तावडेंचे अनेक व्हिडिओ समोर येत आहेत. महाराष्ट्रात मतदान होणार आहे, त्याआधी भाजपचे नेते पैशांच्या जोरावर निवडणुकीवर परिणाम करत आहेत. यात कार्यकर्त्यांपासून मोठ्या नेत्यांपर्यंत सर्वांचा समावेश आहे. निवडणूक आयोगाने या प्रकरणाची दखल घेऊन कठोर कारवाई करावी.’
Vinod Tawde : माहिती नसतानाचा बोलणं बालिशपणा.., राहुल गांधींच्या आरोपांवर विनोद तावडेंचं प्रत्युत्तर
बहुजन आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी मतदारांमध्ये पैसे वाटल्याचा आरोप केला. नालासोपाऱ्यातील विवांता हॉटेलमध्ये चार तास तावडे होते. विनोड तावडेंना बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी घेरलं होतं. मात्र काही वेळानंतर हितेंद्र ठाकूर आणि तावडे या दोघांनी संयुक्त पत्रकारपरिषद घेतली, मात्र निवडणूक आयोगाने परवानगी दिली नाही. महाविकास आघाडीने भाजपला या संपूर्ण प्रकणावरुन धारेवर धरलं आहे.