Maharashtra Assembly Election Exit Poll Result Dairy: पोल डायरीच्या एक्झिट पोलनुसार राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार येणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या एक्झिट पोलनुसार राज्यात महायुतीला १२२ ते १८६ जागा मिळण्याचा अंदाज आहे.
पोल डायरीच्या एक्झिट पोलनुसार राज्यात भाजपला ७७ ते १०८ जागा, शिवसेना शिंदे गटाला २७ ते ५०, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला १८ ते २८ जागा मिळण्याची शक्यता आहे. महायुतीला २८८ पैकी १२२ ते १८६ जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.या एक्झिट पोलनुसार महाविकास आघाडीला राज्यात ६९ ते १२१ जागा मिळतील. मविआमधील काँग्रेसला २८ ते ४७, शिवसेना उद्धव ठाकरे गटाला १६ ते ३५ आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला २५ ते ३९ जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी आज २० तारखेला चुरशीने मतदान झाल्याचे पाहायला मिळाले. मतदानाच्या वेळी अनेक ठिकाणी राडा झाल्याच्या समोर आले. आता २३ तारखेला निकाल जाहीर होणार असून राज्यात नवे सरकार कोणाचे असेल हे शनिवारी स्पष्ट होईल.
मतांच्या टक्केवारीचा विचार केल्यास महायुतीला ४४.०९ टक्के मते मिळण्याचा अंदाज आहे. भाजपला सर्वाधिक २३.७८ टक्के, शिवसेना शिंदे गटाला १३.५२ टक्के, राष्ट्रवादी अजित पवार गटाला ६.७९ टक्के मते मिळण्याचा अंदाज आहे. महाविकास आघाडीला ४०.०१ टक्के मते मिळू असे पोल डायरीने म्हटले आहे. मविआमधील काँग्रेलला १६.४२ टक्के, शिवसेना उद्धव ठाकरे गटाला १२.३७ टक्के, राष्ट्रवादी शरद पवार गटाला ११.२२ टक्के मते मिळण्याचा अंदाज आहे. राज्यात १५.९९ टक्के मते अन्यला मिळू शकतील.
राज्यातील २८८ मतदारसंघात भाजपने सर्वाधिक १४९ उमेदवार उभे केले होते. त्यानंतर काँग्रेसने १०१, शिवसेना उद्धव ठाकरे गटाने ९५, शरद पवार गटाने ८६, शिवसेना शिंदे गटाने ८१ आणि अजित पवार गटाने ५९ उमेदवार उभे केले होते.