Maharashtra Assembly Election 2024: निवडणूक आयोगाच्या अधिकृत अॅपवरील आकडेवारीनुसार, राज्यात सरासरी ६२.६८ टक्के, मुंबई शहरात ५०.९८ टक्के, तर मुंबई उपनगरात ५५.०७ टक्के मतदान झाले.
हायलाइट्स:
- दिग्गज उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद
- बोगस मतदान, मतदारांना पैसे वाटल्याच्या तक्रारी
- बोगस पत्र, व्हिडीओ संदेशामुळे कार्यकर्त्यांमध्ये वादावादी
राज्यात मतदानाची प्रकिया पार पडत असतानाच बोगस मतदान, मतदान केंद्राची तोडफोड, मतदारांना पैसेवाटपाच्या तक्रारी, उमेदवारांच्या बोगस पाठिंब्याची पत्रे आणि व्हिडीओ संदेश यामुळे अनेक मतदारसंघात मतदान प्रक्रियेला बाधा आला. याशिवाय दोन गटांत हाणामारी, कार्यकर्त्यांमध्ये वादावादी, तसेच उमेदवार आणि नेत्यांची निवडणूक अधिकारी व पोलिसांना दमदाटी आदी घटना काही मतदारसंघांत घडल्या. मुंबईत वरळी विधानसभा मतदारसंघात शिवसेना (उबाठा) पक्षाचे आदित्य ठाकरे, शिंदे यांच्या शिवसेनेचे मिलिंद देवरा आणि मनसेचे संदीप देशपांडे यांच्यात तिरंगी लढत आहे. परंतु, सकाळी मतदान प्रक्रिया सुरू असताना मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सहीचे बनावट पत्र व्हायरल करण्यात आले. या पत्रात मनसेने शिंदे गटाचे उमेदवार मिलिंद देवरा यांना पाठिंबा जाहीर केल्याचे नमूद करण्यात आले होते. हे पत्र शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून व्हायरल होत असल्याच्या संशयावरून शिंदे आणि मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये वादावादी झाली. तर, शीव कोळीवाडा विधानसभा मतदारसंघात भाजप आमदार प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांनी निवडणूक अधिकारी तसेच पोलिस कर्मचाऱ्यांना दमदाटी केल्याचा प्रकार पुढे आला आहे.
दिंडोशी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या शिंदे आणि ठाकरे गटात वादावादी झाली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांना शांत केले. बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे उमेदवार धनंजय मुंडे निवडणूक लढवत असलेल्या परळी विधानसभा मतदारसंघातील घटनांदूर गावात बोगस मतदानाच्या संशयावरून मतदान केंद्राची तोडफोड करण्यात आली. तर, धर्मापुरी गावातील मतदान केंद्रात सीसीटीव्ही कॅमेरा बंद असल्याच्या कारणावरून तणाव निर्माण झाला होता. तसेच काही ठिकाणी मतदारयादीत नाव नसल्याच्या तक्रारी मतदारांनी केल्या आहेत. तसेच, बीड जिल्ह्यातील केज, परळी, आष्टी या मतदारसंघांत दोन गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाल्याच्या घटना घडल्या. राष्ट्रवादीच्या दोन गटांची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागलेल्या बारामती विधानसभा मतदारसंघात अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून दमदाटी झाल्याची तक्रार शरद पवार गटाचे उमेदवार युगेंद्र पवार यांच्या मातोश्री शर्मिला पवार यांनी केल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता.
अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी मतदारसंघात प्रवरा वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना मतदार बनवून त्यांच्याकडून मतदान करवून घेण्यात आले. यातील बहुतांश विद्यार्थी हे परराज्यातील असल्याचा दावा काँग्रेस उमेदवार प्रभावती घोघरे यांनी केला आहे. नाशिक जिल्ह्यातील नांदगाव विधानसभा मतदारसंघात मतदारांना अडविण्यावरून शिंदे गटाचे उमेदवार सुहास कांदे आणि अपक्ष उमेदवार समीर भुजबळ यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक उडाली. तसेच, येवल्यात अजित पवार गटाचे उमेदवार छगन भुजबळ यांना मतदान केंद्रात येण्यापासून प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या कार्यकर्त्यांनी रोखल्याची घटना समोर आली आहे. याशिवाय नागपूरमध्ये काँग्रेस उमेदवार बंटी शेळके यांच्याकडून मतदारांना पैसे वाटप केले जात असल्याच्या तक्रारीवरून निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांच्याशी संबंधित कार्यालय सील करण्यात आले.
राजकीय नेते, उमेदवार, सेलिब्रिटींनी बजावला मतदानाचा हक्क
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर, बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर, रिलायन्स उद्योग समूहाचे प्रमुख मुकेश अंबानी, अभिनेता शाहरुख खान, अभिनेता सलमान खान यांच्यासह उद्योग, बॉलिवूड, क्रीडा आदी क्षेत्रांतील विविध मान्यवरांनी सहकुटुंब मतदान केंद्रांवर जाऊन मतदानाचे कर्तव्य पार पाडले. सकाळी मतदान केल्यानंतर प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी सकाळपासून मतदारसंघात फिरून मतदानाचा आढावा घेतला.
उद्धव ठाकरेंचा शाखा संवाद
उद्धव ठाकरे यांनी मतदानाचा हक्क बजावल्यानंतर मुंबईतील काही निवडक शाखांना भेटी देऊन शिवसैनिकांशी संवाद साधला. यावेळी ठाकरे यांनी मतदारसंघातील मतदानाची परिस्थिती आणि पक्षाला कुठून मतदान झाले, मतदान प्रक्रियेच्या दरम्यान काही अडचणी आल्या का, याविषयी माहिती घेतल्याचे सांगण्यात आले.
महत्त्वाच्या उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद
शिवसेना (एकनाथ शिंदे) : एकनाथ शिंदे, गुलाबराव पाटील, दादा भुसे, दीपक केसरकर, तानाजी सावंत, उदय सामंत, अब्दुल सत्तार, संजय राठोड, शंभूराज देसाई.
भाजप : देवेंद्र फडणवीस, राहुल नार्वेकर, गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे पाटील, डॉ. विजयकुमार गावित, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, सुरेश खाडे, रवींद्र चव्हाण, मंगलप्रभात लोढा.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) : अजित पवार, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, धर्मरावबाबा आत्राम, हसन मुश्रीफ, आदिती तटकरे, संजय बनसोडे, अनिल भाईदास पाटील, नवाब मलिक.
काँग्रेस : पृथ्वीराज चव्हाण, नाना पटोले, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार.
शिवसेना (उबाठा) : आदित्य ठाकरे, अजय चौधरी, वैभव नाईक, सुनील प्रभू.
राष्ट्रवादी काँग्रेस (शप) : जयंत पाटील, राजेश टोपे, बाळासाहेब पाटील, शशिकांत शिंदे, जितेंद्र आव्हाड, रोहित पवार, युगेंद्र पवार, रोहित पाटील.