Maharashtra Assembly Election 2024: इगतपुरी-त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघात आदिवासींनी घराबाहेर पडत भरभरून मतदान केले.
महिलांमध्येही मतदानासाठी अभूतपूर्व उत्साह होता. महायुतीचे उमेदवार हिरामण खोसकर, अपक्ष निर्मला गावित, मनसेचे काशीनाथ मेंगाळ, घोटीचे अपक्ष उमेदवार जयप्रकाश शिवराम झोले यांनी घोटी मतदान केंद्रांवर भेटी देऊन परिस्थितीचा धावता आढावा घेतला. सहायक निवडणूक अधिकारी तथा इगतपुरीचे तहसीलदार अभिजित बारावकर यांनी घोटी, इगतपुरी आदी भागांतील मतदान केंद्रांना भेटी देऊन व्यवस्थेची पाहणी केली. घोटीतील मतदान केंद्रावर एका वयोवृद्ध महिलेलाही खुद्द सहायक निवडणूक अधिकारी बारावकर यांनी केंद्रापर्यंत मदतीचा हात दिला.
अनुचित प्रकार घडू नये यासाठी घोटी पोलिस ठाण्याचे निरीक्षक विनोद पाटील व पथक नियंत्रण ठेवून होते. ‘ईव्हीएम ‘मध्ये बिघाड इगतपुरी शहरालगत असलेल्या तळेगाव मतदान केंद्रावर मतदान यंत्रात एकाच उमेदवाराला मत जात असल्याच्या भावनेतून मतदारांमध्ये गोंधळ निर्माण झाला होता. यावेळी प्रशासन व निवडणूक यंत्रणेने तात्काळ मतदान केंद्रस्थळी धाव घेत माहिती घेतली. तांत्रिक दोष दूर करून मतदान पुन्हा सुरळीत झाले. बारावकर यांनी मतदान सुरळीत असल्याचे नमूद केले.
त्र्यंबकमध्येही वाढला उत्साह
त्र्यंबकेश्वर तालुक्यात मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. ग्रामीण भागात सकाळी सात वाजेपासून ते सायंकाळी पाचपर्यंत रांगा लागलेल्या होत्या. सरासरी ७० टक्के मतदान झाले. नूतन त्र्यंबक विद्यालयातील एका मतदान केंद्रावर रांगेत मतदार उभे असताना दुपारी दोन वाजेच्या सुमारास अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी जेवणासाठी मतदान प्रक्रिया थांबवली. तोपर्यंत मतदार ताटळकत उभे राहिले होते. बाहेरगावी वास्तव्यास असलेले मतदारही उपस्थित राहिले. साधू-महंतांनीही मतदानाचा हक्क बजावला. माजी नगराध्यक्ष प्रशांत तुंगार यांचा हात मोडलेला असताना त्यांनी दवाखान्यातून थेट मतदान केंद्रावर हजेरी लावत मतदानाचा हक्क बजावला.