Maharashtra Assembly Election 2024: लाडकी बहीण योजना, मुस्लिम, ओबीसी आणि मराठा समाजाच्या एकगठ्ठा मतदानामुळे यंदा मतदानाची टक्केवारी वाढली. उत्तर महाराष्ट्रात महायुती सरकारमधील सहा विद्यमान मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
लाडकी बहीण योजना, मुस्लिम, ओबीसी आणि मराठा समाजाच्या एकगठ्ठा मतदानामुळे यंदा मतदानाची टक्केवारी वाढली. उत्तर महाराष्ट्रात महायुती सरकारमधील सहा विद्यमान मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. येवल्यात छगन भुजबळ, मालेगाव बाह्यमध्ये दादा भुसे, नंदुरबारमधून डॉ. विजयकुमार यावित, जामनेरमधून गिरीश महाजन, जळगाव ग्रामीणमधून गुलाबराव पाटील आणि अमळनेरमधून अनिल पाटील या सहा मंत्र्यांसह एकूण ५०० उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झाले. नाशिकमधील १५ मतदारसंघ, जळगावमधील ११, धुळ्यातील पाच; तर नंदुरबारमधील चार अशा एकूण ३५ जागांवर मतदारांनी उत्साह दाखविल्याचे दिसून आले.
धाकधूक वाढली
नाशिकमध्ये ६७.५७ टक्के मतदान झाले. जळगाव जिल्ह्यात सन २०१९मध्ये ६०.९० टक्के मतदान झाले होते. यंदा हा आकडा ६०.३७ टक्क्यांवर आला. धुळ्यात गेल्या वेळी ६०.८४ टक्के मतदान झाले होते. यंदाच्या निवडणुकीत हा आकडा ६४.७० टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. नंदुरबारमध्येही गेल्या वेळेस ६६.३७ टक्के मतदान झाले होते. यंदा ६९.१५ टक्के मतदान झाले. मतदारांच्या रांगा रात्री उशिरापर्यंत कायम राहिल्याने चारही जिल्ह्यांतील मतटक्का वाढून विद्यमान सहा मंत्र्यांसह प्रस्थापितांची धाकधूक वाढली आहे. रात्री उशिरा आलेल्या आकडेवारीनुसार नाशिक जिल्ह्यात ६७.५७ टक्के मतदान झाले.
जिल्हा सरासरी मतदान
नाशिक ६७.५७ टक्के
जळगाव ६०.३७ टक्के
नंदुरबार ६९.१५ टक्के
धुळे ६४.७० टक्के
कांदे-भुजबळ भिडले
नांदगाव विधानसभेसाठी शिवसेना शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे आणि अपक्ष उमेदवार समीर भुजबळ यांच्यात बुधवारी मतदानाच्या दिवशीही जोरदार राडा झाला. कांदे यांनी बोलावलेल्या मतदारांना भुजबळांनी अडवल्याने संतप्त झालेल्या कांदेंनी समीर भुजबळांना थेट जीवे मारण्याची धमकी दिली. ‘आज तुझा मर्डर फिक्स आहे’ अशा शब्दांत कांदेंनी धमकावल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर तणाव निवळला, तरी भुजबळांनी कांदेंवर कारवाईची मागणी केली आहे. मात्र, आपण समीर भुजबळांना धमकी दिली नसल्याची सारवासारव कांदेंनी केली आहे. येवल्यातही छगन भुजबळ यांना काही ठिकाणी राजकीय कार्यकत्यांकडून अडवण्याचा प्रकार घडला.
नाशिक पूर्व मतदारसंघामध्येही आमदार राहुल ढिकले आणि गणेश गितेंचे समर्थक भिडल्याने काही काळ तणाव निर्माण झाला, तर नाशिक मध्य मतदारसंघातही आमदार देवयानी फरांदे आणि वसंत गिते आमनेसामने आले. मात्र, पोलिसांनी वेळीच खबरदारी घेतल्याने संघर्ष टळला. नाशिक पश्चिममध्ये उत्तमनगरमध्ये जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला