Maharashtra Assembly Election Results: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडलं. यंदा गेल्या ३० वर्षांचा रेकॉर्ड मोडला गेला आहे. यावेळी ६५.११ टक्के मतदान झाले आहे. याने कोणाला फायदा होणार आणि कोणाला फटका बसणार हे निकालाच्या दिवशी कळेलच.
या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात ६१.३९ टक्के मतदान झाले. तर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ६१.४ टक्के मतदान झाले होते. महाराष्ट्रातील मतदानाची टक्केवारी वाढल्याचे श्रेय मुख्यकरुन सत्ताधारी महायुती आणि महाविकास आघाडी (एमव्हीए) यांच्या प्रचाराला दिली जात आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीला एकूण ४२.७१ टक्के मते मिळाली, तर महाविकास आघाडीला ४३.९१ टक्के मते मिळाली होती.
यंदा मतदानाच्या टक्केवारीत किमान ३.५ टक्क्यांची वाढ झाली आहे. या वेळी महाराष्ट्रात कोणाची सत्ता येणार यासाठी मतदानाची वाढलेली टक्केवारी निर्णायक ठरु शकते. २०१९ मध्ये महाराष्ट्रात ८.८५ कोटी मतदार होते, जे २०२४ मध्ये वाढून ९.६९ कोटी झाले आहेत. त्यापैकी ५ कोटी पुरुष आणि ४.६९ महिला मतदार आहेत. यंदा ४१३६ उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये ३७७१ पुरुष तर ३६३ महिला उमेदवार आहेत.
अधिक मतदानाचा फायदा सत्ताधारी महायुतीला होऊ शकतो, असं बोललं जात आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ज्या-ज्यावेळी मतदानाचा टक्का वाढला आहे, त्याचा फायदा भाजपला झाला आहे. मागील निवडणुकीच्या तुलनेत यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढली आहे. याचा फायदा भाजप आणि महायुतीला होणार आहे.
तर, महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, मविआ निवडणूक जिंकणार आहे. लोकांमध्ये उत्साह आहे. महाराष्ट्रातील स्वाभिमानी नागरिक राज्याच्या हिताला प्राधान्य देणारे सरकार निवडून देतील. काँग्रेस पक्ष राज्यात सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येईल. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होणे निश्चित आहे.
Vidhan Sabha Nivadnuk: ३० वर्षांनंतर पहिल्यांदा इतक्या मोठ्या प्रमाणात मतदान, १९९५ मध्ये कोणाचं सरकार आलेलं?
१९९५ मध्ये कोणाचं सरकार आलं होतं?
महाराष्ट्रात तब्बल ३० वर्षांनंतर इतक्या मोठ्या प्रमाणात मतदान झाले आहे. यापूर्वी १९९५ मध्ये ७१.६९ टक्के मतदान झाले होते. त्यानंतर राज्यात शिवसेनेचे सरकार स्थापन झाले होतो आणि मनोहर जोशी हे मुख्यमंत्री झाले. तेव्हा दोन टप्प्यात मतदान झाले. त्यावेळी अविभाजित शिवसेना आणि भाजपची युती झाली होती आणि मनोहर जोशी राज्याचे १२ वे मुख्यमंत्री बनले होते. महाराष्ट्रात प्रथमच बिगर काँग्रेसचं सरकार स्थापन झालं होतं. त्या निवडणुकीत काँग्रेसने ८०, शिवसेनेने ७३ आणि भाजपने ६५ जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे यंदा कोणाचं सरकार येणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.