नंदुरबारमध्ये मतदारांचा उत्साह द्विगुणित, वाढलेला मतटक्का कोणाच्या पथ्यावर?

Nandurbar Vidhan Sabha Voting Percentage: नंदुरबार जिल्ह्यातील चार विधानसभेच्या निवडणुकीसाठी तब्बल 72.33 टक्के मतदान झाले. मागील 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत 5.96 टक्के अधिक तर काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभेच्या तुलनेत 1.68 टक्के अधिक मतदान झाले आहे.

Lipi

महेश पाटील, नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातील चार विधानसभेच्या निवडणुकीसाठी तब्बल 72.33 टक्के मतदान झाले. मागील 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत 5.96 टक्के अधिक तर काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभेच्या तुलनेत 1.68 टक्के अधिक मतदान झाले आहे. हे अधिकचे मतदान कोणाच्या पथ्यावर पडणार हे निकालातून स्पष्ट होणारच आहे. 2019च्या तुलनेत शहादा मतदारसंघात मात्र कमी मतदान झाले आहे. तर चुरशीची लढत असलेल्या नंदुरबार, नवापूर व अक्कलकुवा येथे मतदानाचा टक्का वाढला आहे. यातील मतदारसंघातील वाढलेला टक्का अनेक उमेदवारांची धाकधूक वाढवणार आहे.

नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा, शहादा, नंदुरबार व नवापूर या चार विधानसभा मतदारसंघांत एकूण 31 उमेदवार रिंगणात होते. यावेळी 72.33टक्के मतदान झाले आहे. यात नंदुरबार विधानसभा मतदारसंघात भाजपाचे मंत्री डॉ. विजयकुमार गावित व काँग्रेसचे किरण तडवी त्यांच्यात अटीतटीची लढत होती. या विधानसभेत भाजपाची खरी लढत काँग्रेसशी नव्हे तर शिंदे शिवसेनेच्या शिवसेनेशी होती. कारण विजयकुमार गावित यांच्याविरुद्ध उघडपणे प्रचार करण्यात आला. मात्र मतदानाच्या शेवटच्या दोन दिवसात या विधानसभेत हिंदुत्वाचा मुद्दा केंद्रस्थानी आला. 2019मध्ये नंदुरबार विधानसभेसाठी 55.28 टक्के मतदान झाले होते. तर लोकसभेत 66.67 टक्के मतदान झाले होते. 2024 च्या विधानसभेसाठी नंदुरबारमधून 67.20 टक्के मतदान झाले आहे. मागील विधानसभेच्या तुलनेत 11.92 टक्के अधिक मतदान झाले आहे. या मतदारसंघात 2019मध्ये डॉक्टर विजयकुमार गावित 75 हजारांपेक्षा अधिक मतांनी विजयी झाले होते. तर लोकसभेत त्यांचे मताधिक्य घटून 33 हजारांवर आले. त्यामुळे वाढलेला मतटक्का नेमका कोणाच्या पारड्यात हे पाहणे महत्वाचे आहे.
Konkan Voting Percent : चाकरमानी बस भरुन तळकोकणात, मतदानाचा टक्का वाढला, कुणाला धक्का, कुणाला बुक्का?

अक्कलकुव्यात लोकसभेच्या तुलनेत टक्का घसरला

अक्कलकुवा हा राज्यातील प्रथम क्रमांकाचा मतदारसंघ आहे. यात अक्कलकुवा व अक्रानी हे दोन विभाग येतात. यात एकूण 3 लाख 12 हजार 370 मतदार आहेत. या मतदारसंघात काँग्रेसतर्फे माजी मंत्री तथा आमदार ॲड. के.सी.पाडवी हे सात वेळेस विजयी झाले आहेत . यंदा त्यांना काँग्रेसकडून पुन्हा उमेदवारी देण्यात आली होती. 2019 मध्ये त्यांच्याविरोधात आमदार आमश्या पाडवी यांनी उमेदवारी मिळाली होती. त्यावेळी पाडवी यांचा 2 हजार 96 मतांनी निसटता पराभव झाला होता. यावेळी महायुतीतर्फे त्यांच्या विरोधात पुन्हा आमदार आमश्या पाडवी यांना उमेदवारी देण्यात आली. त्यासोबतच भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्ता माजी खासदार हिना गावित यांनी पक्षाचा राजीनामा देत या मतदारसंघातून अपक्ष म्हणून रिंगणात होत्या. त्यासोबत काँग्रेसचे माजी मंत्री पद्माकर वळवी हे देखील भारतीय आदिवासी पार्टीतर्फे रिंगणात होते. त्यामुळे अक्कलकुवा मध्ये चौरंगी लढत रंगली. चारही दिग्गज उमेदवार असल्याने जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्याचे लक्ष या विधानसभा मतदारसंघाकडे लागून आहे. त्यामुळे अक्कलकुवा विधानसभेत लोकसभेला 75.01 टक्के मतदान झाले होते. मात्र विधानसभेला मतदाराच्या टक्का घसरून 71.97 इतका झाला. 2019 च्या विधानसभेत 71.76 टक्के मतदान झाले होते. निवडणुकीत दोन तालुक्यातील समस्या, विकास यावरच निवडणूक रंगली.

शहाद्यात मतदानाचा टक्का वाढला

शहादा विधानसभा मतदारसंघात भाजपातर्फे आमदार राजेश पाडवी तर काँग्रेसतर्फे भाजपाचा राजीनामा देऊन आलेले राजेंद्रकुमार गावित यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यामुळे महाआघाडीतील घटक पक्षांनी याबाबत विरोधाची भूमिका घेत काँग्रेस पक्षातील नेत्यांवरच विविध आरोप लावले होते. त्यामुळे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी शेवटच्या दिवशी नंदुरबार मध्ये येत नाराजांचे मन वळवले होते. त्यामुळे समोरासमोर लढत बघायला मिळाली. राजेश पाडवी यांनी विविध विकास कामांच्या जोरावरच प्रचार केला. या विधानसभेत 2019 मध्ये 65.31टक्के मतदान झाले होते. यंदा 69.1 टक्के मतदान झाले. मागील विधानसभेच्या तुलनेत 4.30 टक्क्यांनी वाढ झालेली आहे. असे असले तरी लोकसभेला 71. 49 टक्के मतदान झाले होते. लोकसभेला काँग्रेसला या विधानसभेतून मोठे मताधिक्य मिळाले होते. मात्र विधानसभेत नाराजीचा फटका काँग्रेसला बसण्याची शक्यता आहे. राजेश पाडवी यांच्या विकास कामांमुळे त्यांना मुस्लिम मतेही मिळू शकण्याचा अंदाज बांधला जात आहे. चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत कोण बाजी मारेल हे 23 तारखेलाच कळणार आहे.

नवापूर विधानसभेत सात टक्के अधिक मतदान

नवापूर विधानसभेत तिरंगी लढत बघायला मिळाली काँग्रेसतर्फे आमदार शिरीषकुमार नाईक, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतर्फे भरत गावित तर अपक्ष म्हणून शरदकुमार गावित यांच्या तिरंगी लढत रंगली. 2019 च्या विधानसभेत या मतदारसंघात 75.37 टक्के मतदान झाले होते. तर लोकसभेत 80.18 टक्के मतदान झाले. यंदाच्या विधानसभेत हा टक्का वाढून 81.15 टक्के झाला. या विधानसभेत तिरंगी लढत अतिशय चुरशीची पाहायला मिळाली. अपक्ष उमेदवार शरदकुमार गावित यांना मतदारांनी चांगला प्रतिसाद दिला. तालुक्यातील रस्ते, स्थलांतर, रोजगार, विकास कामे या प्रमुख मुद्द्यांवर निवडणूक लढवली गेली. शिंदे शिवसेनेचे नेते चंद्रकांत रघुवंशी यांच्यासह कार्यकर्त्यांनी सुरुवातीला भरत गावित यांना मदत केली. मात्र निवडणुकीच्या दोन दिवस आधी ते काँग्रेसचे उमेदवार शिरीषकुमार नाईक यांच्याकडे झुकल्याचे चित्र होते. त्यामुळे भरत गावित यांना सहानुभूतीचा फायदा होण्याची शक्यता आहे. 2019 च्या तुलनेत अक्कलकुवाला 34 हजार 129, शहादामध्ये 36 हजार 418, नंदुरबार मध्ये 88 हजार 778 आणि नवापूर मध्ये 27 हजार309 ने मतदान वाढले आहे. जिल्ह्याभरात 1 लाख 86 हजार 634 मतदान वाढले आहे. त्यामुळे हे वाढलेले मतदान कुणाच्या पथ्यावर पडते हे दोन दिवसातच कळणार आहे.

लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड…. आणखी वाचा

Source link

Heena GavitK C Padvinandurbar vidhan sabha constituenciesVijay kumar gavitvoting percentage in Nandurbarके सी पाडवींचे वजन वाढणारनंदुरबार विधानसभेतील मतदाननंदुरबारमधील मतदानाचा टक्काविजयकुमार गावितांना फळणारहीना गावितांनी कसा फायदा
Comments (0)
Add Comment