Maharashtra Vidhan Sabha Election: तळकोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली, कुडाळ व सावंतवाडी या तीनही विधानसभा मतदारसंघांसाठी सायंकाळी पाच वाजेपर्यंत एकूण ६७.६० टक्के मतदान झाले.
कोणताही अनुचित प्रकार न होता मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. तळकोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली, कुडाळ व सावंतवाडी या तीनही विधानसभा मतदारसंघांसाठी सायंकाळी पाच वाजेपर्यंत एकूण ६७.६० टक्के मतदान झाले. अंतिम मतदानाची आकडेवारी ७० टक्क्यांच्या आसपास पोहोचण्याची शक्यता आहे. सकाळपासूनच सर्व मतदान केंद्रांवर मतदारांचा उत्साह पाहायला मिळाला. २०१९च्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात ६३.९२ टक्के मतदान झाले होते.
शहरांसह ग्रामीण भागातील केंद्रांवर मतदारांनी रांगा लावल्या. सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी स्वतः रानबांबुळी, कुडाळ शहरातील कुडाळ हायस्कूल, न्यू इंग्लिश स्कूल येथील मतदान केंद्रांना भेट देऊन पाहणी केली. जिल्हाधिकारी कार्यालयात स्थापलेल्या वेबकास्टिंगच्या माध्यमातून तीनही मतदारसंघांतील संपूर्ण मतदान प्रकियेवरही ते बारकाईने लक्ष ठेवून होते. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली, गुहागर, चिपळूण, रत्नागिरी, लांजा राजापूर या पाच मतदारसंघांत सायंकाळी पाच वाजेपर्यंत उपलब्ध आकडेवारीनुसार ६०.३५ टक्के मतदान झाले. मतदानाची अंतिम आकडेवारी ६५ जाण्याचा अंदाज आहे. कोकणात नारायण राणे, रामदास कदम, दीपक केसरकर, मंत्री उदय सामंत, शिवसेना उबाठा पक्षाचे भास्कर जाधव या नेत्यांनी आपल्या कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला.
मुंबईहून धाव मुंबईहून कोकणात
खास मतदानासाठी आलेल्या मतदारांमध्ये मोठा उत्साह होता. मात्र, मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूककोंडीमुळे अनेकांना मतदान केंद्रावर पोहोचण्यास उशीर झाला. सहा वाजण्यापूर्वी मतदान केंद्रावर दाखल झालेल्या मतदारांसाठी काही केंद्रांवर उशिरापर्यंत मतदान प्रक्रिया सुरू होती. अनेक मतदारांनी कोकण रेल्वेने गावी येऊन आपला मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये अनेक नवमतदारांचाही समावेश होता.