Parbhani Vidhan Sabha Women Voting : परभणीत लोकसभेच्या तुलनेत विधानसभेला महिलांच्या मतदानाची टक्केवारी वाढली आहे. लाडकी बहीण योजनेमुळे टक्केवारी वाढली असल्यास याचा फायदा सत्ताधाऱ्यांना होऊ शकतो.
जिंतूर मतदारासंघात काय परिस्थिती?
परभणी जिल्ह्यात एकूण चार विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यापैकी जिंतूर विधानसभा मतदारसंघात १ लाख ८८ हजार २२ महिला मतदार आहेत, त्यापैकी १ लाख ३८ हजार २०९ महिलांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. महिलांनी बजावलेल्या मतदानाच्या टक्केवारीचा विचार केला तर ७३.५१ टक्के महिलांनी मतदान केले आहे. काही महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत केवळ ५९.९१ टक्के म्हणजेच १ लाख ७५६३ महिलांनी मतदानाचा हक्क बजावला होता. जिंतूर विधानसभा मतदारसंघात तब्बल १४ टक्के महिलांचं मतदान जास्त झालेलं आहे. हे १४ टक्के मतदान ज्याच्या पारड्यात पडेल त्याचा विजय मात्र सुकर असल्याचे आता स्पष्ट दिसून येत आहे.
परभणी विधानसभा मतदारसंघात आकडेवारी कशी?
परभणी विधानसभा मतदारसंघात १ लाख ७१ हजार ७४० महिला मतदार आहेत. त्यापैकी १ लाख १० हजार २४३ महिलांनी मतदानाचा हक्क बजावला. तब्बल ६४.१९ टक्के महिलांच्या मतदानाची टक्केवारी आहे. काही महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीचा विचार केला तर ९७३४८ महिलांनी मतदानाचा हक्क बजावला होता. त्यांच्या मतांची टक्केवारी ५९.९३ टक्के एवढी होती. या विधानसभा निवडणुकीत तब्बल पाच टक्के महिलांचे मतदान जास्त झाले आहे. अन्य विधानसभा मतदारसंघाच्या तुलनेत परभणीमध्ये महिलांचे वाढलेले मतदान हे कमी असले, तरी हे पाच टक्के मतदान एखाद्या उमेदवाराला विजयी करू शकते.
गंगाखेड विधानसभेत महिला मतदारांची टक्केवारी किती?
गंगाखेड विधानसभा मतदारसंघात २ लाख ३ हजार १४७ महिला मतदार आहेत. त्यापैकी १ लाख ४५ हजार ५९७ महिलांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. महिला मतदानाची टक्केवारी तब्बल ७१.६७ टक्के एवढी आहे. मागील लोकसभा निवडणुकीमध्ये गंगाखेड विधानसभा मतदारसंघात १ लाख १७ हजार ८५६ महिलांनी मतदानाचा हक्क बजावला होता, त्याची टक्केवारी ६०.१४ टक्के एवढी होती. विधानसभा निवडणुकीत तब्बल ११ टक्के जास्त महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. या ११ टक्के महिला एखाद्या उमेदवाराला सहजरित्या जिंकून आणू शकतात.
पाथरी विधानसभेत महायुतीला फायदा होणार?
पाथरी विधानसभा मतदारसंघांमध्ये १ लाख ९० हजार १९७ महिला मतदार आहेत. त्यापैकी १ लाख ३१ हजार ९५८ महिलांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. महिला मतदानाची टक्केवारी तब्बल ६९.३८ टक्के एवढी आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये पाथरी विधानसभा मतदारसंघातील १ लाख १० हजार ७१२ महिलांनी मतदानाचा हक्क बजावला होता. त्यांची मतदानाची टक्केवारी ६०.८६ टक्के एवढी होती. लोकसभेपेक्षा विधानसभा निवडणुकीत पाथरी विधानसभा मतदारसंघात ९ टक्के जास्त महिलांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. लाडक्या बहिणींनी जर महायुतीला मतदान केले तर मात्र मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फायदा महायुती सरकारला नक्कीच झाला असे दिसून येईल.
लाडक्या बहिणींच्या मतदानाचा टक्का वाढला, वाढलेल्या मतदानाचा फायदा कुणाला? पाहा आकडेवारी काय सांगते?
संपूर्ण परभणीत लाडकी बहीण योजनेचा फायदा होणार?
एकंदरीत परभणी जिल्ह्यामध्ये 7 लाख ५३ हजार १०६ महिला मतदार आहेत, त्यापैकी ५ लाख २६ हजार ७ महिलांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. महिला मतदानाची टक्केवारी पाहिली असता तब्बल ६९.८५ टक्के एवढी आहे. मागील लोकसभा निवडणुकीत महिला मतदारांनी केलेल्या मतदानाची आकडेवारी पाहिली असता ६० टक्के महिलांनी मतदान केल्याचे दिसून येत आहे. तब्बल १० टक्के जास्त महिला मतदारांनी विधानसभा निवडणुकीत मतदान केल्याने हे १० टक्के मतदान कोणाच्या पारड्यात पडणार हे मात्र निकालानंतर स्पष्ट होईल. जर मतदान मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे झाले असले, तर मात्र महायुतीला याचा जबरदस्त फायदा देखील होऊ शकतो असे चित्र आहे.