मावळ हादरलं! गाडामालकाला संपवलं, आरोपीची फोन बंद करत नातेवाईकांसोबत चॅटिंग, असा झाला उलगडा

मावळ तालुक्यातील एका गाडामालकाचा खून करून आरोपींनी खंडणीसाठी गुन्हा केल्याचा बनाव रचला. पंडित जाधव या गाडामालकाचे सूरज वानखेडे आणि त्याच्या साथीदाराने अपहरण केले. त्यानंतर तळेगाव एमआयडीसी परिसरात दोरीने गळा आवळून त्यांचा खून करून मृतदेह जाळण्यात आला. पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेने सूरजला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

महाराष्ट्र टाइम्स

पुणे : मावळ तालुक्यातील प्रसिद्ध गाडामालकाचा दोरीने गळा आवळून दोघांनी खून झाला आहे. खंडणीसाठी हा गुन्हा केल्याचा बनाव आरोपींनी रचला. गाडा मालकाचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळला. याबाबत पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी आणि औद्योगिक तक्रारी निवारण पथकाने तपास करून आरोपीला अटक केली आहे. पंडित रामचंद्र जाधव (वय ५२, रा. जाधववाडी डॅमजवळ, नवलाख उंबरे, ता. मावळ) असे खून झालेल्या गाडामालकाचे नाव आहे. सूरज मच्छिंद्र वानखेडे (वय २३, रा. जाधववाडी डॅमजवळ, नवलाख उंबरे, ता. मावळ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिस उपायुक्त संदीप डोईफोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘मावळ तालुक्यातील प्रसिद्ध गाडामालक पंडित जाधव यांचे १४ नोव्हेंबर रोजी अपहरण झाले असून, जाधव यांच्या व्हॉट्सअॅप क्रमांकावरून त्यांच्या नातेवाइकांना ५० लाख रुपयांची खंडणी आरोपी मागत आहेत,’ अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक देवेंद्र चव्हाण यांना मिळाली. त्यानंतर खंडणीविरोधी आणि औद्योगिक तक्रारी निवारण पथकाने जाधव यांच्या नातेवाइकांकडे चौकशी केली.

पंडित जाधव यांचा मोबाइल क्रमांक बंद होता. मात्र त्यांच्या क्रमांकावरून व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून मेसेज येत होते. पोलिसांनी जाधव यांच्या मोबाइलचे तांत्रिक विश्लेषण; तसेच परिसरातील सीसीटीव्ही तपासले. त्यामध्ये सूरज वानखेडेच्या हालचाली संशयास्पद असल्याचे आढळले. सूरज गावी पळून जाण्याच्या तयारीत असताना त्याला बधलवाडी येथून ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता, त्याने त्याचा मित्र रणजितकुमार याच्या मदतीने पंडित जाधव यांचे अपहरण केल्याचे; तसेच त्याच रात्री तळेगाव एमआयडीसी परिसरात वैयक्तिक कारणावरून दोरीने गळा आवळून त्यांचा खून केल्याचे सांगितले.

दरम्यान, पंडित जाधव हे त्यांच्या पंचक्रोषीमध्ये गाडामालक म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांच्याकडे मॉगी नावाचा बैल असून अनेक शर्यतींमध्ये बाजी मारली आहे. मावळमधील त्यांचे गाडामालक म्हणून नाव चर्चेत असायचे. हत्या करण्यामागचे मुख्य कारण अद्याप समोर आलेले नाही. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं असून या प्रकरणाचा आणखी तपास करत आहेत.

लेखकाबद्दलहरिश मालुसरे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. क्रीडा, राजकीय आणि क्राईम बातम्यांमध्ये विशेष आवड. झी 24 तास आणि टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 04 वर्षांचा अनुभव…. आणखी वाचा

Source link

Maval CrimePunePune crimePune crime newsपुणे क्राईम बातम्यापुणे बातम्यापुणे मराठी बातम्या
Comments (0)
Add Comment