Axis My India Exit Poll Prediction for Chief Minister : अॅक्सिस माय इंडिया संस्थेच्या एक्झिट पोलमध्ये मुख्यमंत्रिपदासाठी कोणाला सर्वाधिक पसंती आहे, याचीही चाचपणी करण्यात आली आहे
मुख्यमंत्रिपदासाठी पसंती कुणाला?
अॅक्सिस माय इंडिया पोलमध्ये महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्यांमधून कुणाला सर्वाधिक पसंती आहे, हे समोर आलं आहे. मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांना तब्बल ३१ टक्के जणांनी पसंती दिली आहे. साहजिकच ते महायुतीतून अव्वल ठरले आहेत. तर महाविकास आघाडीतून उद्धव ठाकरे यांना सर्वाधिक पसंती मिळाली आहे. त्यांना १८ टक्के मतं मिळाली आहेत. एकूण क्रमावलीत ते दुसऱ्या स्थानी आहेत.
पवार आणि आंबेडकरही
तिसऱ्या क्रमाकांवर माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. फडणवीसांना १२ टक्के जनतेने पसंती दिली आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस : शरदचंद्र पवार पक्षाकडून ज्येष्ठ नेते शरद पवार यांना पसंती मिळाली आहे. त्यांना चौथ्या क्रमाकांची ५ टक्के मतं मिळाली आहे. त्या खालोखाल पाचव्या नंबरवर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर ३ टक्के मतांसह आहेत.
दादा-नाना यांच्यात टाय
सहाव्या क्रमांकावर चौघा जणांमध्ये रस्सीखेच आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले या तिघांनाही प्रत्येकी २ टक्के मतं मिळाली आहेत. यासोबतच ‘किंगमेकर’ म्हणून पाहिले जात असलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ‘किंग’च्या भूमिकेत पाहण्यास २ टक्के जण उत्सुक आहेत. इतरांना ६ टक्के जणांची पसंती मिळाली आहे.
चाणक्यचा एक्झिट पोल काय सांगतो?
दुसरीकडे, चाणक्यच्या एक्झिट पोलनुसार राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार येण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. एक्झिट पोलनुसार भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीला १७५ जागा मिळतील, तर महाविकास आघाडीला १०० जागा मिळण्याचा अंदाज आहे. इतरांना १३ जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.