नागपूर ग्रामीणमध्ये ‘काँटे की टक्कर’, मतदानाचा टक्का सत्तरी पार, बावनकुळेंसमोर मोठं आव्हान

Nagpur Vidhan Sabha Election: नागपूर ग्रामीणमध्ये यंदा मोठ्या प्रमाणात मतदान पार पडले, त्यामुळे मतदारसंघात ‘काँटे की टक्कर’सारखी स्थिती टक्केवारीवरून दिसून येते.

महाराष्ट्र टाइम्स

म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर: नागपूर ग्रामीण अर्थात रामटेक लोकसभा मतदारसंघांर्तगत येणाऱ्या सहाही मतदारसंघांत ‘काँटे की टक्कर’सारखी स्थिती टक्केवारीवरून दिसून येते. रामटेक आणि उमरेड मतदारसंघाने टक्क्यांची सत्तरी पार करून जिल्ह्यात आघाडी घेतली. त्याखालोखाल काटोल व सावनेर राहिले. हिंगणा सर्वात कमी होते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासमोर गृहमतदारसंघासह अन्य ठिकाणीही विजय मिळवण्याचे आव्हान उभे ठाकले होते. उद्या, शनिवारी चित्र स्पष्ट होईल.

भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे यांना पक्षाने कामठीतून तब्बल एक दशकानंतर संधी दिली. गेल्यावेळी त्यांचा पत्ता साफ केला होता. ते विधान परिषद सदस्य असतानाही पक्षाने त्यांना मैदानात उतरवले. कामठीत सहा टक्के मतदान वाढले. यावेळी ६४.०५ टक्के तर, गेल्यावेळी ५८.८५ टक्के झाले होते. वाढलेला टक्का कुणाच्या पारड्यात पडला, यावर मंथन सुरू आहे. काँग्रेसचे सुरेश भोयर यांच्यासोबत झालेली त्यांची थेट लढत काट्याची ठरली का, अशी चर्चा मतदानावरून सुरू आहे. भोयर यांच्या पाठीशी आक्रमक व्यूहरचना आखणारे माजी मंत्री सुनील केदार राहिले.

रामटेकमध्ये मतांचा टक्का पाचहून अधिक वाढला. या मतदारसंघात सुनील केदार व खासदार श्याम बर्वे यांनी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांना बळ दिल्याने शिवसेनेचे (ठाकरे गट) विशाल बरबटे यांच्यासमोर आव्हान उभे ठाकले. मुळक यांची एक दशकापासून तर, बरबटे यांनी दोन वर्षांपासून तयारी केली. अपक्ष म्हणून निवडून आलेले व नंतर शिंदे गटात गेलेले आशिष जयस्वाल अशी तिरंगी लढत झाली. यावेळी ७१.८० टक्के तर, गेल्यावेळी ६६.०९ टक्के मतदान झाले.

हिंगणामध्ये मतदानाच्या टक्केवारीत विशेष फरक पडलेला नाही. गेल्यावेळी ६०.०५ टक्के तर, यावेळी ५९.८९ टक्के मतदान झाले. भाजपचे समीर मेघे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप) रमेश बंग यांच्यातील लढतीत टक्क्यांमुळे भाजप नेते थोडे रिलॅक्स झाले. बंग यांचे वय लक्षात घेऊन त्याच्या उमेदवारीबाबत अजूनही कार्यकर्ते अचंबित आहेत.

सावनेर मतदारसंघ काँग्रेस नेते माजी मंत्री सुनील केदार यांच्यासाठी प्रतिष्ठेचा झाला. त्यांच्या पत्नी अनुजा काँग्रेसकडून तर, तब्बल दीड दशकानंतर डॉ. आशिष देशमुख भाजपकडून या मतदारसंघात उतरले. थेट लढत होत असताना आशिष यांचे बंधू डॉ. अमोल देशमुख यांनीही मैदानात उडी घेतली. दिग्गज उमेदवार असले तरी, एक टक्काच मते वाढली. यावेळी ६८.८३ टक्के झाले, गेल्यावेळी ६७.८३ मतदारांनी हक्क बजावला होता.

उमरेडमध्ये काँग्रेसचे संजय मेश्राम, भाजपचे सुधीर पारवे व प्रमोद घरडे यांच्यातील तिरंगी लढतीत यावेळी दोन टक्के मतदान वाढले. टक्क्यांनी काँग्रेसचा विश्वास उंचावला.

काटोलकडेही राज्याचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप) अनिल देशमुख यांची घोषणा झाल्यानंतर मैदानात उतरलेले त्यांचे पुत्र सलील यांच्यासमोर भाजपचे चरणसिंग ठाकूर, अपक्ष याज्ञवल्क्य जिचकार आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून (अप) नामसाधर्म्य असणारे अनिल देशमुख घड्याळ चिन्हावर होते. चारही उमेदवारांमुळे मतदानात फरक पडला नाही. गेल्यावेळी ६९.४४ टक्के तर, यावेळी ६९.९४ टक्के मतदान झाले.

Nagpur: नागपूर ग्रामीणमध्ये ‘काँटे की टक्कर’, मतदानाचा टक्का सत्तरी पार, बावनकुळेंसमोर मोठं आव्हान

स्थिती अशी

हिंगणा : २,६९,५९९ (५९.८९ टक्के)कामठी : ३,२१,३८५ (६४.०५ टक्के)

काटोल : १,९६,८०१ (६९.९४ टक्के)

रामटेक : २,०६,०१४ (७१.८० टक्के)

सावनेर : २,२१,४९५ (६८.८३ टक्के)

उमरेड : २,१४,०२८ (७१.१२ टक्के)

लेखकाबद्दलनुपूर उप्पलनुपूर उप्पल, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत, याआधी टीव्ही ९ मराठी, साम टीव्ही, इन मराठी वेबसाईटसाठी काम केलंय. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ७ वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक लिखाणाची आवड. गुन्हेगारीसंबंधित, विज्ञानविषयक बातम्यांमध्ये हातखंडा… आणखी वाचा

Source link

Chandrashekhar BawankuleDevendra FadnavisEknath ShindeSharad PawarUddhav Thackerayvidhan sabha nivadnuk 2024महायुतीमहाविकास आघाडीविधानसभा निवडणूकविधानसभा निवडणूक निकाल २०२४
Comments (0)
Add Comment