पुण्यातील कोथरूड आणि खडकवासला मतदारसंघात काही उमेदवारांच्या समर्थकांनी निकालाआधीच विजयाचे बॅनर्स लावल्याने चर्चेला उधाण आले आहे. कोथरूडमध्ये भाजपचे चंद्रकांत पाटील आणि खडकवासलात राष्ट्रवादीचे सचिन दोडके यांच्या समर्थकांनी ही उत्सुकता वाढवली आहे. २०१९ मध्ये दोन्ही जागांवर अनुक्रमे पाटील आणि भाजपचे भीमराव तापकीर विजयी झाले होते. निकाल २३ नोव्हेंबर रोजी जाहीर होणार आहे.
कोथरूड विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपकडून चंद्रकांत पाटील, शिवसेना ठाकरे गटाकडून चंद्रकांत मोकाटे आणि मनसे किशोर शिंदे अशी तिरंगी लढत झाली. माजी मंत्री राहिलेल्या पाटलांचं पारडं जड होतं. कोथरूडकरांनी दादांनाचा मागील निवडणुकीमध्ये पसंती दिली होती. मेधा कुलकर्णी यांचे तिकीट कापत त्यांच्या जागी दादांना २०१९ मध्ये उमेदवारी देण्यात आली होती. त्यामुळे ब्राह्मण समाजाने त्यावेळी नाराजी दर्शवली होती. मात्र तरीही चंद्रकांत पाटील यांनी विजय मिळवला होता. २०१४ मध्ये मेधा कुलकर्णी यांनी शिवसेनेच्या मोकाटे यांचा पराभव केला होता. यंदाच्या निवडणुकीमध्ये तिंरगी लढत झाल्यावर विजयाचा गुलाल कोण उधळणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
पुण्यामधील खडकवासला मतदारसंघात शरद पवार गटाचे नेते सचिन दोडके यांच्या विजयाचे बॅनर्स झळकले होते. इतकंच नाहीतर सचिन दोडके यांच्या समर्थकांनी त्यांची जंगी मिरवणूकही काढली होती. सचिन दोडकेंच्या समर्थकांनी २०१९ मध्येही बॅनर्स झळकवले होते, पण त्यावेळी त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. अवघ्या २५९५ मतांनी सचिन दोडकेंचा पराभव करत भाजपचे भीमराव तापकीर तिसऱ्यांदा निवडून आले होते. यंदाच्या निवडणुकीमध्ये खडकवासला मतदारसंघात भाजप वेगळा उमेदवार देणार असल्याची चर्चा होती. मात्र भाजपने शेवटच्या काही याद्यांमध्ये तापकीर यांचे तिकीट जाहीर झाले आहेत.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या निकालाला अवघे काही तास बाकी आहेत. मतदारांनी २० नोव्हेंबरला मतदान केलं असून कोणाला गुलाल उधळायला मिळणार? कोणाच्या पदरी निराशा पडणार हे २३ तारखेला समजणार आहे.