Jalgaon Vidhan Sabha Nivadnuk: जळगावात दोन घरात निधन झालं. कुणी आपल्या आईला गमावलं तर कुणी आपल्या पत्नीला. तरी त्यांनी आधी मतदानाचं कर्तव्य पार पाडलं आणि मग अंत्यसंस्कार केले. त्यांच्या या निर्णयाने सारेच भारवून गेले.
घरात पत्नीचा मृतदेह, पतीकडून मतदान करत आदर्श उदाहरण
जळगाव जिल्ह्यातील कळमडू (ता. चाळीसगाव) येथील छायाबाई राजेंद्र बच्छे (वय वर्ष ४०) यांचे मतदानाच्या दिवशीच आकस्मिक निधन झाले. त्यानंतरही पती राजेंद्र नामदेव बच्छे यांनी भावांसह मतदान केंद्रावर जावून मतदानाचे कर्तव्य पार पाडले.
मुलगा सैनिकी प्रशिक्षणाला बेळगावात, मुलीने दिला आईला अग्नी
राजेंद्र नामदेव बच्छे हे शेतमजूर आहेत. घरात पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. मुलगा अंकुश बच्छे याची चार महिन्यांपूर्वी छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या अग्निवीर भरतीत निवड झाली होती. तो प्रशिक्षणासाठी बेळगाव येथे गेला आहे. मुलगा सैनिकी प्रशिक्षणाला बेळगाव येथे असल्याने आईच्या अंत्यविधीसाठी येऊ शकला नाही. त्यामुळे मुलगी रोहिणी बच्छे हिने आईला अग्निडाग दिला.
आई गेल्याचं दु:ख, तरी राष्ट्रीय कर्तव्य पूर्ण केलं
दुसऱ्या घटनेत एरंडोल शहरात किराणा दुकानदार विशाल राजेंद्र येवले यांच्या आई सुनीता राजेंद्र येवले यांचे बुधवारी पहाटे सहा वाजता निधन झाले. संपूर्ण परिवार दुःखात बुडालेला असताना, विशाल याने यासमयीदेखील आई गमावल्याचं दुःख बाजूला सारून राष्ट्रीय कर्तव्याचा विचार केला.
Jalgaon: कुणी पत्नी, कुणी आईला गमावलं, पण आधी मतदान मग अंत्यसंस्कार… यांच्या निर्णयाने सारे भारावले
आईच्या अंत्यसंस्कारापूर्वी मतदानाचा हक्क बजावला
आईचा मृतदेह घरात असताना अंत्यसंस्काराची घाई न करता आधी मतदानाचा हक्क बजावला आहे. ‘माझे मतदान हे तिच्या स्मरणार्थ आहे. ती नेहमी मला कर्तव्याचे महत्त्व शिकवत असे’, अशा शब्दांत मुलाने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.