Maharashtra Election 2024: विधानसभा निवडणूक निकालाला काही तास राहिलेले असताना सी व्होटरचे संस्थापक यशवंत देशमुख यांनी चक्रावून टाकणारे आकडे समोर आणले आहेत.
महायुती आणि महाविकास आघाडीत मतांचं अंतर केवळ १ टक्का असेल. त्यांच्यामधील जागांची तफावत केवळ ८ जागांची असेल. तर ६१ जागांवर अगदी अटीतटीच्या लढती होतील. याच ६१ जागा राज्यात कोणाचं सरकार येणार याचा निकाल लावतील, अशी आकडेवारी यशवंत देशमुख यांनी मांडली आहे. महायुतीला ४१ टक्के मतांसह ११२ जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर महाविकास आघाडीला ४० टक्के मतांसह १०८ जागांवर यश मिळण्याचा अंदाज आहे. तब्बल ६१ जागांवर अगदी घासून लढत होईल.
महाराष्ट्रातील पाच विभाग पाच राज्यांप्रमाणे आहेत. तिथली परिस्थिती वेगळी आहे, असं यशवंत देशमुख यांनी सांगितलं. ‘दोन विभागांत महायुती, तर दोन विभागांत महाविकास आघाडी पुढे आहे. एका विभागात अटीतटीचा मुकाबला आहे. त्यामुळे राज्य स्तरावर व्होट शेअरमध्ये फारसं अंतर नाही,’ असं देशमुख म्हणाले.
‘मुंबई, कोकण, उत्तर महाराष्ट्रात महायुतीला व्होट शेअरच्या बाबतीत मोठी आघाडी आहे. तर पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यात महाविकास आघाडीकडे मोठ्या अंतरानं पुढे आहे. पण विदर्भात परिस्थिती वेगळी आहे. व्होट शेअरच्या बाबतीत इथे काँटे की टक्कर आहे. त्यामुळे सगळ्यात मोठा पक्ष कोण असेल, कोणाला बहुमत मिळेल, यामध्ये विदर्भाची भूमिका निर्णायक असेल,’ असं विश्लेषण देशमुख यांनी केलं.
‘अटीतटीच्या लढती असलेल्या ६१ जागांपैकी बहुतांश जागा एका पारड्यात गेल्यास सुस्पष्ट निकाल लागेल. पण या जागा ३०-३० अशा दोन्ही बाजूला गेल्यास तर बहुमताचा आकडा गाठणं महायुती, महाविकास आघाडीला अवघड असेल. ६१ पैकी अधिकाधिक जागा एका बाजूला गेल्यास आघाडी किंवा महायुतीला बहुमत मिळेल. पण या जागा एका बाजूला जातील, इथे खरी मेख आहे,’ असं देशमुख यांनी सांगितलं.