Uddhav Thackeray: विधानसभा निवडणूक निकालाला अवघे काही तास राहिलेले असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का दिला आहे.
सचिन शिंदे आणि त्यांच्या समर्थकांनी मातोश्रीवर जात ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. विधानसभा निवडणुकीच्या निकालास काही तासांचा अवधी राहिलेला असताना शिंदेंचा ठाकरेसेनेतील प्रवेश भाजपसाठी धक्का मानला जात आहे. शिंदे यांच्या हाती ठाकरेंनी शिवबंधन बांधलं. यावेळी माहीमचे ठाकरेसेनेचे उमेदवार महेश सावंत आणि सिनेट सदस्य प्रदीप सावंत उपस्थित होते. शिवसेना भवन, छत्रपती शिवाजी महाराज पार्क याच मतदारसंघात येत असल्यानं माहीमची जागा दोन्ही शिवसेनेसाठी महत्त्वाची आहे. त्यामुळे इथे दोन्ही शिवसेनेची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
माहीममध्ये तिरंगी लढत
माहीममध्ये यंदा तिरंगी लढत होत आहे. विद्यमान आमदार आणि शिवसेनेचे उमेदवार सदा सरवणकर, शिवसेना उबाठाचे महेश सावंत आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अमित ठाकरे यांच्यात लढत होत आहे. माहीममधील राजकारण, इथल्या घडामोडी राज्यभरात चर्चेत राहिल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी इथून सदा सरवणकर यांना तिकीट दिलं. राज ठाकरेंचे पुत्र रिंगणात असल्यानं, राज यांनी लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानं सरवणकरांनी उमेदवारी मागे घ्यावी, असा आग्रह भाजपच्या बड्या नेत्यांनी घेतला. त्यासाठी बैठकादेखील झाल्या.
सदा सरवणकर विद्यमान आमदार असल्यानं शिंदे त्यांची उमेदवारी मागे घेण्यास फारसे उत्सुक नव्हते. त्यातच राज ठाकरेंनी एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात पुढचा मुख्यमंत्री भाजपचा होईल. मला माझ्या पक्षाचं चिन्ह मतदारांमुळे मिळालं आहे. ते मी कोणाकडून ढापलेलं नाही. मला ते कोर्टानं दिलेलं नाही, अशी विधानं केली. ही विधानं शिंदेंनी खटकली. त्यामुळे त्यांनी माहीमचा विषय संपवला आणि सरवणकर यांना ग्रीन सिग्नल दिला, असं सेनेतील सुत्रांनी सांगितलं.