Maharashtra Election Result 2024: महायुतीत १४८ जागा लढविणाऱ्या एकट्या भाजपने १३२ जागा जिंकून स्वबळावर साध्या बहुमताकडे झेप घेतली आहे. भाजपच्या पाठोपाठ शिवसेनेने ५७, तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने ४१ जागांवर विजय मिळवला आहे. महाविकास आघाडीला फक्त ४६ जागांवर समाधान मानावे लागले आहे.
हायलाइट्स:
- लाडक्या बहिणींची महायुतीला सत्तेची ओवाळणी
- महायुतीचा अभूतपूर्व विजय, आघाडीचा धुव्वा
- आघाडीच्या दिग्गज नेत्यांना पराभवाचा धक्का
- देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रिपदाची चर्चा
- मुंबई, ठाणे, कोकणात महायुतीचा ठाकरेंना धक्का
भाजपचा मुख्यमंत्री होण्याची शक्यता
राज्यात विधानसभा निवडणुकीत आलेल्या महायुतीच्या या महालाटेत महाविकास आघाडीचा अक्षरशः धुव्वा उडाला आहे. महायुतीत एकट्या भाजपने १३२ हून अधिक जागा जिंकल्या आहेत. १९९० नंतर विधानसभा निवडणुकीत सार्वधिक जागा जिंकणारा भाजप हा पहिला पक्ष ठरला आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीचे आव्हान परतून लावत भाजपने २०१४ पासून सलग तिसऱ्यांदा शतकी मजल मारली आहे. साहजिकच या ऐतिहासिक कामगिरीमुळे भाजप मुख्यमंत्रिपदावर दावा सांगण्याची शक्यता आहे. भाजपमध्ये मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांचे नाव सर्वात आघाडीवर आहे. मुख्यमंत्रिपदाचा निर्णय झाल्यानंतर राज्यपालांची भेट घेऊन महायुतीकडून सत्तास्थापनेचा दावा केला जाणार आहे. नव्या सरकराचा शपथविधी वानखेडे स्टेडियम, शिवाजी पार्कवर होण्याची शक्यता आहे.
दिग्गजांनी चाखली पराभवाची धूळ
या निवडणुकीत काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, माजी मंत्री यशोमती ठाकूर, के. सी. पाडवी, वसंत पुरके, सुनील देशमुख, माणिकराव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी मंत्री राजेश टोपे, हर्षवर्धन पाटील, शशिकांत शिंदे, राजेंद्र शिंगणे, प्राजक्त तनपुरे, गुलाबराव देवकर आदींसह माजी राज्यमंत्री बच्चू कडू, बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर तसेच क्षितीज ठाकूर यांना पराभवाचा जबरदस्त फटका बसला आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह भाजपचे राधाकृष्ण विखे पाटील, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, अतुल सावे, शिंदे गटाचे उदय सामंत, दीपक केसरकर, संजय राठोड, शंभूराज देशमुख, अब्दुल सत्तार तसेच अजित पवार गटाचे छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, मावळत्या विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिमाखदार विजय मिळवला आहे. महायुतीच्या या लाटेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना विजयासाठी शेवटच्या फेरीपर्यंत वाट पहावी लागली. महायुतीच्या लाटेत महाराष्ट्र नवनिर्माण सेना, वंचित बहुजन आघाडीसह सर्वच छोटे वाहून गेले आहेत.
मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीस यांचे नाव आघाडीवर
महायुतीत सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या भाजपचा मुख्यमंत्रिपदावर दावा असून या पदासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव आघाडीवर आहे. भाजपचे नेते अमित शहा यांनी निवडणूक प्रचाराच्या एका जाहीर सभेत फडणवीस मुख्यमंत्री होणार असल्याचे सूतोवाच केले होते. मात्र, ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री असे महायुतीत ठरलेले नाही, असे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या पदासाठी आपली दावेदारी कायम ठेवली आहे. परंतु, त्याचवेळी महायुतीत मुख्यमंत्रिपदावरून वाद नाही. तिन्ही पक्षाचे नेते एकत्र बसून मुख्यमंत्रिपदाचा निर्णय घेऊ, असा खुलासा शिंदे, फडणवीस आणि अजित पवार यांनी केला आहे. दरम्यान, महायुतीत मुख्यमंत्रिपद भाजपकडे येणार असेल तर या पदासाठी भाजप श्रेष्ठी फडणवीस यांना संधी देतील की राजस्थान, मध्य प्रदेशप्रमाणे महाराष्ट्रात धक्कातंत्र वापरतील, याची राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.