८० चा स्ट्राईक रेट, ४० च्या वर जागा; दादांच्या रणनीतीला कमालीचं यश, गुलाबी रंग निरखून निघाला

Edited byनुपूर उप्पल | Authored by समर खडस | महाराष्ट्र टाइम्स | Updated: 24 Nov 2024, 7:34 am

Ajit Pawar Strategy In Vidhan Sabha Nivadnuk: अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने जवळपास ८० टक्क्यांच्या आसपासचा ‘स्ट्राइक रेट’ राखला. त्यांच्या ४०च्या वर जागा संध्याकाळापर्यंत येत असल्याचे निश्चित झाले.तर, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत सन्नाटा पसरला.

महाराष्ट्र टाइम्स

मुंबई: अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा दारुण पराभव होणार, त्यांच्या १०-१५ जागाच येतील, स्वतः अजित पवार हे बारामतीतून पडू शकतात, जिंकलेच तर अत्यंत कमी मताधिक्याने जिंकतील, बारामतीचा अंदाज शरद पवार यांच्याइतका कुणालाच येत नाही, असे सगळे आडाखे बारामती आणि राज्यातील जनतेने पार मातीमोल ठरवले. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने जवळपास ८० टक्क्यांच्या आसपासचा ‘स्ट्राइक रेट’ राखला. त्यांच्या ४०च्या वर जागा संध्याकाळापर्यंत येत असल्याचे निश्चित झाले आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत सन्नाटा पसरला, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकत्यांनी ल्यायलेला गुलाबी रंग अधिकच निरखून निघाला.

भारतीय जनता पक्षासोबत जाऊनही, ‘ही राजकीय तडजोड आहे, वैचारिक नाही. आम्ही अजूनही फुले-शाहू-आंबेडकर यांची विचारधारा सोडलेली नाही. ‘बटेंगे तो कटेंगे’ हा भाजपचा नारा आम्हाला मान्य नाही’, असे अजित पवार यांनी ठामपणे सांगितले. ही भूमिका ते आवश्यक त्या व्यासपीठांवर सातत्याने मांडत राहिले. अजित पवार यांचा पक्ष केवळ ५५ जागा लढवत होता. असे असतानाही पाच जागांवर त्यांनी मुस्लिम उमेदवार दिले व त्यातले हसन मुश्रिफ आणि सना मलिक जिंकूनही आले. या सगळ्या मागे निवडणुकीसाठी ठरवलेली रणनीती व त्याबरहुकूम दिलेले उमेदवार आणि कार्यकत्यांनी केलेली चोख मेहनत हेच कारण आहे.
Eknath Shinde: आमचं काहीही ठरलं नव्हतं, मुख्यमंत्रिपदाबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य, पाहा काय म्हणाले?
अजित पवार हे अत्यंत मगरूर नेते आहेत, ते कुणाचाही अपमान करतात, त्यांनी सिंचन घोटाळ्यात ७० हजार कोटींचा भ्रष्टाचार केला आहे, त्यांच्या काकांनीच त्यांना राजकारणात बोट धरून चालायला शिकवले व त्यांच्याच पाठीत त्यांनी खंजीर खुपसला, आदी सगळे आरोप अजित पवार यांनी धुवून टाकले. लोकसभा निवडणुकीत त्यांनी व त्यांच्या पक्षातील काही नेत्यांनी शरद पवार यांच्यावर चढवलेल्या वैयक्तिक हल्ल्यांमुळे जनतेने दर्शवलेली नाराजी महागात पडली. त्यातून अजित पवार यांनी धडा घेतला आणि या निवडणुकीत त्यांनी पवार यांच्यावर वैयक्तिक टीका करणे टाळले. उलट दुसऱ्या बाजूला शरद पवार यांनी अजित पवार व त्यांच्या साथीदारांवर वैयक्तिक हल्ले चढवले. ते दिलीप वळसे पाटलांना गद्दार म्हणाले. अजितपवारांच्या तर हातातच खंजीर चिकटवलेला आहे, असे वातावरण पवार व त्यांच्या शिष्यांनी तयार केले होते. खरेतर हाच खंजीर अनेक वर्षे वसंतदादांच्या बाबतीत पवारांनी वापरल्याचा आरोप होत असे. मात्र या आरोपाला जनता धुडकावून लावत होती. त्याचाच विसर पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला पडत होता. शरद पवारांच्या वारंवार कानाला लागणारे काही नेते तर मुद्दामहून अजित पवारांवर तुटून पडत होते. हे सगळे होत असताना आधीच आपापल्या मतदारसंघात तगडे नेते असलेले अजित पवार यांचे आमदार कामाला लागले होते. कारण लोकसभेच्या अनुभवानंतर अजित पवार यांनी आपल्या प्रत्येक आमदाराला विकासकामांसाठी केवळ निधीच दिला नाही, तर प्रत्येक आमदाराला निवडणूक गांभीर्याने घेतली नाही, तर पराभव निश्चित आहे, याचीही जाणीव करून दिली होती. त्याचा मोठा फायदा पक्षाला झाल्याचे दिसत आहे.

Ajit Pawar: ८० चा स्ट्राईक रेट, ४० च्या वर जागा; दादांच्या रणनीतीला कमालीचं यश, गुलाबी रंग निरखून निघाला

आपल्यासोबत असलेल्या पूर्वीच्या जनाधारातील जी मते लोकसभेला दूर गेली होती, ती पुन्हा परत आणण्यासाठीही रणनीती ठरवली गेली. गाव पातळीवर, अगदी गल्ली-बोळांत बैठका घेऊन त्यातील प्रश्न मार्गी लावा व जे लागणार नाहीत त्यांची माहिती मुख्यालयात येऊन द्या, आदी अनेक आदेशांचे तंतोतंत पालन राष्ट्रवादीचे उमेदवार व कार्यकत्यांनी केले. त्यामुळेच भाजपसोबत आघाडीत असूनही मराठा आणि मुस्लिम या दोन्ही समजांची मते त्यांच्या राष्ट्रवादीला मिळाली व दणदणीत ‘स्ट्राइक रेट’ सह त्यांनी शरद पवारांना मात दिली, हे स्पष्ट आहे.

लेखकाबद्दलनुपूर उप्पलनुपूर उप्पल, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत, याआधी टीव्ही ९ मराठी, साम टीव्ही, इन मराठी वेबसाईटसाठी काम केलंय. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ७ वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक लिखाणाची आवड. गुन्हेगारीसंबंधित, विज्ञानविषयक बातम्यांमध्ये हातखंडा… आणखी वाचा

Source link

ajit pawarmaharashtra assembly election resultncpVidhan Sabha Nivadnukअजित पवारअजित पवार बातम्याविधानसभा निवडणूक निकालविधानसभा निवडणूक २०२४
Comments (0)
Add Comment