Who Is Amol Khatal: पहिलीच निवडणूक आणि बाळासाहेब थोरातांची सत्ता संपूर्ण हादरवून सोडली. नवव्यांदा निवडणूक लढवणाऱ्या बाळासाहेब थोरातांचा पराभव करणारे अमोल खताळ कोण आहेत?
पहिल्यांदाच निवडणूक लढवणारे अमोल खताळ जायंट किलर ठरले. विखे पिता पुत्रांनी मोठी ताकद लावत बाळासाहेब थोरातांच्या सत्तेला सुरूंग लावलाय.
विखेंच्या नियोजनबद्ध प्रचारयंत्रणेमुळे आणि निवडणूक हलक्यात घेणं थोरातांना महागात पडलंय. एक साधारण कॉम्प्युटर सेंटर चालक तरुणाने अनेक वर्ष मंत्री राहिलेल्या दिग्गज नेत्याला धोबीपछाड दिल्याने अमोल खताळ यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
थोरातांना धोबीपछाड देणारे अमोल खताळ कोण?
अमोल धोंडीबा खताळ पाटील वय ४१ वर्ष यांचा जन्म संगमनेर येथील एका सामान्य शेतकरी कुटुंबात झाला. अमोल यांचे शिक्षण – बी. कॉम
(डिप्लोमा इन कॉम्पुटर हार्डवेअर व सॉफ्टवेअर) – शिक्षण पूर्ण करून सुरूवातीला स्वतःचे कम्प्युटर सेंटर सुरू केले. नंतर जमीन खरेदी-विक्री तसेच २५०० सभासद असलेल्या फार्मा प्रोड्युसर कंपनीचे डायरेक्टर आहे. शिक्षण सुरू असतानाच २००१ साली राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पासून त्यांनी आपल्या राजकिय कारकिर्दीला सुरुवात केली आणि त्यानंतर अनेक पद भूषविली.
अमोल २०१७ पासून भाजापात होते आणि संगमनेर येथील भ्रष्टाचार दादागिरी आणि राजकीय दहशतीच्या विरोधात उभा राहणारा व्यक्ती एक कट्टर हिंदुत्ववादी विचाराचा चेहरा म्हणून त्यांची ओळख झाली. तसेच विखे पाटलांचे निकटवर्तीय आहे. संगमनेर हा जिल्हा होण्यासाठी केलेल्या आंदोलनामध्ये सर्वाधिक सक्रिय होते. जवळपास चार महिने हे आंदोलन सुरू होते त्यामध्ये पावणेदोन लाख लोकांना सहभागी करून त्यांच्या स्वाक्षऱ्यांची मोहीम चालवली. संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून १६ हजार लोकांना जोडले. अमोल यांचे वडील धोंडीबा आणि आई विठाबाई खताळ शेतकरी आहे. अमोल यांच्या पत्नी निलम खताळ गृहिणी आहे. अमोल यांचे संगमनेर येथे सामाजिक राजकिय क्षेत्रात योगदान असून गोरगरिबांची जाण असणारा व्यक्ती म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली.
Amol Khatal: पहिल्याच निवडणुकीत थोरातांच्या आठ टर्म साम्राज्याला सुरुंग, संगमनेरचे जाएंट किलर आमदार अमोल खताळ कोण?
भूषवलेली राजकीय पदे
– २००१ -२०१६ :- राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस तालुका स्तरापासून सुरुवात करत महाराष्ट्र प्रदेश सचिव, महासचिव पदापर्यंत यशस्वी मजल
– २००९-२०१६ :- राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव, राष्ट्रीय महासचिव, राष्ट्रीय उपाध्यक्ष, प्रभारी राष्ट्रीय अध्यक्ष
– २०११-२०१६:-दिल्ली, बिहार, गोवा, मुंबई आणि छत्तीसगडचे प्रभारी
– २०११-२०१६:- दिल्ली कार्यालय विद्यार्थी संघटनेचे प्रभारी
– २०१७-२०२३:- भाजपा पक्षामध्ये सक्रिय
– २०२३:- अध्यक्ष संजय गांधी निराधार योजना समिती, संगमनेर
– २०२४:- सध्या जबाबदारी संगमनेर विधानसभा प्रमुख भारतीय जनता पार्टी
– २०२४:- शिवसेना पक्ष प्रवेश आणि आमदार