Amshya Padvi Won Akkalkuva Assembly by Defeating Congress K C Padvi: राज्यातील प्रथम क्रमांकाचा मतदारसंघ असलेल्या अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघावर काँग्रेसचे के. सी. पाडवी यांचे आजतागायत वर्चस्व राहिले आहे. गेल्या ३५ वर्षांपासून त्यांनी आपले वर्चस्व राखले होते. शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आमश्या पाडवी यांनी त्यांच्या वर्चस्वाला सुरुंग लावला आहे.
अक्कलकुवा व अक्रानी विधानसभेच्या विभाजनाआधी १९९०साली के.सी.पाडवी अपक्ष म्हणून विजय झाले होते. तेव्हापासून २०२४पर्यंत ते याच मतदारसंघाचे सलग सातवेळा प्रतिनिधीत्व केले आहे. विधानसभेत काँग्रेसतर्फे त्यांना उमेदवारी देण्यात आली होती. २०२४च्या लोकसभेत त्यांचे पुत्र गोवाल पाडवी यांनी भाजपाच्या हिना गावितांचा मोठ्या फरकाने पराभव केला होता. त्यामुळे या पराभवाचा वचपा काढण्याचा चंगच हिना गावित यांनी बांधला. त्यामुळे या विधानसभेची जागा भाजपला मिळावी अशी मागणी केली. त्यामुळे अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत महायुतीचे घोडे या जागेसाठी अडले होते. अखेर ही जागा शिंदेंच्या शिवसेनेला सुटली. त्यांच्यातर्फे विधान परिषदेचे आमदार आमश्या पाडवी यांना उमेदवारी देण्यात आली. डॉ. हिना गावित यांनी भाजपाचा राजीनामा देत अपक्ष उमेदवारी केली. तसेच माजी मंत्री ॲड.पद्माकर वळवी रिंगणात उतरले.
अटीतटीच्या या लढतीत आमश्या पाडवींनी काँग्रेसचा गड भेदला. आमश्या पाडवींना ३ हजार २८९ एवढे मताधिक्य मिळाले. यातच हिना गावित यांचा पराभव झाला असला तरी त्यांची उमेदवारी शिवसेनेच्या पथ्यावर पडली. त्यांना ६६ हजार ७४६ मते मिळाली. तर के सी पाडवी यांना ६९ हजार १२२ मते मिळाली. विधानसभेत शिंदेंच्या शिवसेनेतर्फे डॉक्टर हिना गावित यांच्यावर सातत्याने टीका करण्यात आली आहे. मात्र हिना गावित यांनी त्यांच्यावर टिप्पणी न करता विधानसभेतील समस्यांची नस पकडली होती. त्यामुळे अनेक समस्यांनी ग्रासलेल्या मतदारांनी महायुतीलाच साथ दिली आहे. त्यांच्या उमेदवारीमुळे के सी पाडवी यांची मते गावितांना मिळाल्याने त्याचा फायदा शिंदेंच्या शिवसेनेला झाला.
पद्माकर वळवी यांच्याकडूनही हिशेब चुकता
2014 मध्ये लोकसभेत अक्कलकुवा मतदारसंघातून भाजपाला 3 हजार 891 मताधिक्य होते. 2019 मध्ये मताधिक्य घटून काँग्रेसला 159 अधिक मते होते. 2024 मध्ये झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत कॉंग्रेसला ४५ हजार ४११ मतांची आघाडी मिळाली मागील निवडणुकीच्या तुलनेत ही 45 हजार 252 मते अधिक आहे. त्यामुळे के.सी.पाडवी यांच्या विजय होईल असे बोलले जात होते. मात्र या ठिकाणी डॉ. हिना गावित व ॲड.पद्माकर वळवी यांच्या उमेदवारीचा फटका के.सी.पाडवी यांना बसला काँग्रेसचे माजी मंत्री पद्माकर वळवी यांचा शहादा मतदारसंघात 2014 मध्ये पराभव झाला होता.तसेच 2019 मध्ये 7 हजार 991 मतांनी पराभव झाला होता.यावेळी एका अपक्ष उमेदवाराने 21 हजाराच्या वर मते मिळवली होती. त्या अपक्ष उमेदवाराला के.सी.पाडवी यांनी रसत पुरवल्याचे बोलले जाते. त्यामुळेच पद्माकर वळवी यांचा पराभव झाला होता. अक्कलकुवा विधानसभेत के.सी पाडवी यांचा 3 हजार 289 मतांनी पराभव झाला.तर पद्माकर वळवी 5 हजार 66 महायुती विरोधातील मते मिळाली. डॉक्टर हिना गावित व पद्माकर वळवी यांच्या उमेदवारीमुळे शिंदे शिवसेनेला फायदा झाला. तसेच त्यांनी मागील निवडणुकीचा हिशोब चुकता केल्याची जिल्ह्यात चर्चा आहे.