Maharashtra Election Result: आम्ही विधानसभा निवडणुकीसाठी मेहनत घेतली. पण आम्हाला अपेक्षित यश मिळालं नाही, अधिकृत आकडेवारी आल्यावर त्याचं विश्लेषण करु आणि पुन्हा एकदा नव्या उत्साहानं लोकांपर्यंत जाऊ, असा निर्धार राष्ट्रवादी काँग्रेस शपचे अध्यक्ष शरद पवार यांनी साताऱ्यात व्यक्त केला.
लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीला पुन्हा सत्ता मिळाली का, असा प्रश्न शरद पवारांना विचारण्यात आला. त्यावर महिलांचं मतदान यंदा चांगलं झालं. आम्ही सत्तेत पुन्हा आलो नाही, तर योजना बंद होईल, असा प्रचार सत्ताधाऱ्यांकडून करण्यात आला होता, याकडे शरद पवारांनी लक्ष वेधलं. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा दिली होती. त्यावरही पवारांनी मोजक्या शब्दांत भाष्य केलं. योगींच्या प्रचारात, घोषणेत ध्रुवीकरणाचा भाव होता, असं पवार म्हणाले.
ईव्हीएमबद्दल विचारण्यात आलेल्या प्रश्नांनादेखील पवारांनी उत्तरं दिली. ईव्हीएममध्ये गडबड झाल्याचा कोणताही पुरावा माझ्याकडे पुरावा नाही. त्याबद्दल माझ्याकडे कोणतीही अधिकृत माहिती नाही. त्यामुळे यावर भाष्य करणं योग्य ठरणार नाही, असं पवारांनी म्हटलं. विधानसभेचा निकाल पाहता आम्हाला अधिक काम करण्याची गरज आहे. महायुतीनं त्यांचा कार्यक्रम प्रभावीपणे राबवला, अशी माहिती मला अनेक कार्यकर्त्यांनी दिली, असं पवारांनी सांगितलं.
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कामगिरीवरही पवार सविस्तर बोलले. त्यांच्या जागा अधिक निवडून आल्या हे मान्य करण्यात काहीच गैर नाही. पण राष्ट्रवादी काँग्रेसचा संस्थापक कोण आहे, हे सगळ्यांना माहीत आहे. बारामतीत युगेंद्र पवारांचा पराभव झाला. त्या मतदारसंघात अजित पवारांचं काम आहे. अजित पवार आणि युगेंद्र पवारांची तुलना होऊ शकत नाही. बारामतीत अजित पवारांनी केलेल्या विकासकामांची आम्हाला कल्पना आहे. त्यामुळे तिथे काय घडेल याचीही आम्हाला कल्पना होती. बारामतीमधून कोणीतरी लढणं गरजेचंच होतं. युगेंद्र पवारांना लवकर लॉन्च तेलं असं म्हणण्यात अर्थ नाही. बारामतीत आम्ही उमेदवारच दिला नसता, तर राज्यात काय मेसेज गेला असता, असा प्रश्न पवारांनी केला.