Maharashtra Election Result: विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी महायुतीनं दणदणीत विजय मिळवला आहे. महायुतीनं तब्बल २३४ जागांवर यश मिळवत सत्ता कायम राखली आहे. महायुतीच्या झंझावातासमोर महाविकास आघाडीची धूळधाण झाली.
महायुतीच्या विजयामुळे महाविकास आघाडीचं भवितव्य अंधारात आहे. दारुण पराभवातून सावरुन उभारी घेण्याचं आव्हान त्यांच्यासमोर आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शपचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना उबाठाचे खासदार संजय राऊत, प्रियांका चतुर्वेदी यांची राज्यसभेची पुढील वाट आता बिकट झालेली आहे. सध्या सुरु असलेली आपली राज्यसभेची अखेरची टर्म असेल असं शरद पवार काही दिवसांपूर्वीच म्हणाले. त्यांनी संसदीय राजकारणातून निवृत्तीचे संकेत दिले. पण संजय राऊत, प्रियंका चतुर्वेदी यांचं काय होणार हा प्रश्न कायम आहे.
महाविकास आघाडीत शिवसेना उबाठाला २०, काँग्रेसला १६ आणि राष्ट्रवादी शपला १० जागा मिळाल्या. त्यांचं एकत्रित संख्याबळ ४६ च्या घरात जातं. तिन्ही पक्षांचा सुफडासाफ झाल्यानं शरद पवार, संजय राऊत, प्रियांका चतुर्वेदी यांना राज्यसभेची पुढील टर्म मिळणं कठीण आहे. महाराष्ट्रातून राज्यसभेवर जाण्यासाठी ४३ चा कोटा आहे. त्यामुळे संपूर्ण महाविकास आघाडी मिळून केवळ एकालाच राज्यसभेवर पाठवू शकते. अंतर्गत राजकारण पाहता अशा परिस्थितीत एकाच्या नावावर सगळेच सहमत होणं अवघड आहे.
ऑगस्ट २०२१ मध्ये एका मराठी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत खासदार चतुर्वेदी यांनी त्यांच्या शिवसेना प्रवेशाचा किस्सा सांगितला होता. २०२० मध्ये चतुर्वेदींनी काँग्रेसला रामराम करत शिवसेनेत प्रवेश केला. ‘मला पक्षप्रवेशाचा दिवस आजही आठवतो. आज माझ्यासाठी एक बहीण आलीय, असं त्यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले होते. तो क्षण भावुक करणारा होता,’ असं चतुर्वेदी म्हणाल्या होत्या. त्यावेळी त्यांचे डोळे अश्रूंनी भरलेले होते.
प्रियंका चतुर्वेदी यांचा राज्यसभेचा कार्यकाळ ३ एप्रिल २०२० पासून सुरु झाला. त्यांचा कार्यकाळ ३ एप्रिल २०२६ मध्ये संपेल. याच दिवशी शरद पवारांचाही राज्यसभेचा कार्यकाळ संपणार आहे. संजय राऊत १ जुलै २०२२ रोजी राज्यसभेवर निवडून गेले. त्यांचा कार्यकाळ २०२८ मध्ये संपणार आहे.