विधानसभा निवडणुकीतील दणदणीत विजयानंतर महायुतीमधील अंतर्गत हेवेदावे समोर येऊ लागले आहेत. रायगडमध्ये महायुतीत ठिणगी पडली आहे. राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे आणि त्यांच्या आमदार कन्या अदिती तटकरेंविरोधात शिवसेनेनं आक्रमक भूमिका घेतली आहे.
अदिती तटकरे श्रीवर्धनच्या आमदार आहेत. मुख्यमंत्री शिंदेंच्या मंत्रिमंडळात त्यांनी काम केलं आहे. अजित पवार महायुतीत गेल्यानंतर अदिती तटकरे यांच्याकडे रायगडचं पालकमंत्रीपद देण्यात आलं. त्यांच्याविरोधात शिवसेना आमदारांच्या अनेक तक्रारी आहेत. नव्या सरकारमध्ये तटकरेंना रायगडचं पालकमंत्रीपद दिलं जाऊ नये यासाठी शिवसेनेच्या आमदारांनी फिल्डींग लावली आहे.
अदिती तटकरेंना पालकमंत्रीपद देऊ नका, अशी आमची भूमिका आहे, असं शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे म्हणाले. ‘आम्ही यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहोत. जिल्ह्यात शिवसेना, भाजपचे तीन-तीन आमदार आहेत. आम्ही कोणत्याही परिस्थितीत तटकरेंना पालकमंत्री होऊ देणार नाही,’ असं थोरवे म्हणाले.
‘भरत गोगावले कॅबिनेट मंत्री झाले, तर मग तेच आमचे पालकमंत्री झाले पाहिजेत. हीच आम्हा सर्वांची इच्छा आहे. तटकरेंना पालकमंत्री देण्यास आमचा जाहीर विरोध आहे. सुनील तटकरेंनी महायुतीशी गद्दारी केली. मग त्यांना पालकमंत्री देण्याचा प्रश्न येतोच कुठे,’ असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
महेंद्र थोरवेंच्या विधानावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अदिती तटकरेंनी प्रतिक्रिया दिली. ‘थोरवेंच्या बोलण्याकडे मी फारसं लक्ष देत नाही. महायुतीचे आमचे नेते याबद्दल काय ते ठरवतील. कोणाला कोणतं पद द्यायचं, कोणती जबाबदारी द्यायची, याचा निर्णय युतीचे नेते घेतील’, असं तटकरे म्हणाल्या.
रायगड जिल्ह्यात कोणाचे आमदार जास्त? संख्याबळ कसं?
पनवेल- प्रशांत ठाकूर (भाजप)
कर्जत- महेंद्र थोरवे (शिवसेना)
उरण- महेश बालदी (भाजप)
पेण- रवीशेठ पाटील (भाजप)
अलिबाग- महेंद्र दळवी (शिवसेना)
श्रीवर्धन- अदिती तटकरे (राष्ट्रवादी काँग्रेस)
महाड- भरत गोगावले (शिवसेना)