Ajit Pawar: विधानसभा निवडणुकीत महायुतीनं दणदणीत विजय मिळवला आहे. महायुतीनं तब्बल २३६ जागांवर यश मिळवलं आहे. सत्ताधाऱ्यांच्या झंझावातासमोर महाविकास आघाडीचा सुपडासाफ झाला.
शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे ५ ते ६ आमदार आमच्या संपर्कात आहेत. ते लवकरच आमच्या सोबत आल्यास आश्चर्य वाटायला नको, असा सनसनाटी दावा अनिल पाटील यांनी केला आहे. ‘शरद पवारांच्या पक्षासह शिवसेना उबाठा, काँग्रेसचे काही आमदार अस्वस्थ आहेत. त्यांच्याशी आमचे जवळचे संबंध आहेत. त्यामुळे त्यांच्याशी चर्चा होत असते. याचे रिझल्ट तुम्हाला ४ महिन्यांत दिसतील,’ असं अनिल पाटील म्हणाले.
‘महाविकास आघाडीतील अनेक आमदार अस्वस्थ आहेत. मतदारसंघात विकास हवा असल्यास सत्तेसोबत जायला हवं, अशी त्यांची भूमिका आहे. विकासाच्या दृष्टीकोनातून सत्तेत जावं अशी आमदारांची भावना आहे. शपथविधी झाल्यानंतर, सत्ता स्थापनेचे सोपस्कार पूर्ण झाल्यावर याबद्दलचं चित्र स्पष्ट होईल. सध्या शरद पवारांचे ५ ते ६ आमदार आमच्या संपर्कात आहेत,’ असं अनिल पाटील यांनी म्हटलं.
मी आता कोणाचीही नावं घेणार नाही, असं सांगताना पाटील यांनी कर्जत-जामखेडचे आमदार आणि शरद पवारांचे नातू रोहित पवारांचा विशेष उल्लेख केला. ‘अजितदादा गटाचे १८ आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा रोहित पवार करत होते. तेव्हा ते कुठे आमदारांची नावं सांगत होते,’ असा सवाल पाटलांनी विचारला.
आमदारांना सत्तेचं समीकरण प्रिय असतं. आम्ही त्यांच्याकडे आग्रह करायला गेलेलो नव्हतो. पण ते सत्तेत येण्यास उत्सुक आहेत. महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाल्यानं अनेकांचं भवितव्य अंधारात आहे. विकासाचा मुद्दा, मतदारसंघातील कामं यासाठी सत्तेत जावं, असं आमदारांना वाटतं. त्यामुळे येत्या काही महिन्यांत बरेच धक्के पाहायला मिळतील, असा दावा त्यांनी केला.