Maharashtra Election Result: लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीनं तब्बल ३० जागा जिंकल्या. सत्ताधारी महायुतीला केवळ १७ जागा मिळाल्या. तेव्हापासून राज्यात सत्तांतर होईल अशी चर्चा सुरु झाली.
लोकसभा निवडणुकीत महायुतीचा दारुम पराभव झाल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी काही आकडेवारी मांडली. महायुतीला २ कोटी ४८ लाख १२ हजार ६२७ मतं मिळाली. तर महाविकास आघाडीच्या पारड्यात २ कोटी ५० लाख १५ हजार ८१९ मतं पडली. दोघांच्या मतांच्या टक्केवारीत केवळ ०.१६ टक्क्यांचा फरक असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. मतांमधील तफावत अवघ्या २ लाखांची आहे. त्यामुळे आम्ही पराभूत झालो, असं विश्लेषण त्यांनी केलं.
लोकसभेतील अपयशानंतर महायुती सरकारनं निर्णयांचा, योजनांचा अक्षरश: धडाका लावला. मध्य प्रदेशात हिट ठरलेली लाडली बेहना योजना लागू करण्यात आली. महिला मतदारांना आपल्याकडे खेचून मविआला मतांच्या टक्केवारीत मागे टाकण्यासाठी लाडकी बहीण योजना आणण्यात आली. अवघ्या ०.१६ टक्के मतांमुळे महायुती १७, महाविकास आघाडी ३० असा निकाल लागला होता. त्यामुळे १ ते २ टक्के अधिक मतं मिळाल्यास महायुतीला बहुमताचा आकडा गाठता येईल, असं गणित मांडून लाडकी बहीण योजना राबवण्यात आली.
मविआची काही लाख मतं आपल्याकडे वळवून त्यांची रेघ लहान करायची असा सोपा प्लान आखण्यात आला होता. पण लाडकी बहीण योजनेनं महायुतीला मतांमध्ये प्रचंड मोठा स्विंग दिला. लोकसभेला २ कोटी ४८ लाख मतं मिळवणाऱ्या महायुतीनं विधानसभेला तब्बल ३ कोटी १७ लाख मतं मिळवली. लोकसभेला ४३.५५ टक्के मतं घेणाऱ्या महायुतीनं विधानसभेत थेट ४९.०८ टक्के मतं घेतली.
महायुतीपेक्षा केवळ २ लाख मतं अधिक घेतल्यानं मविआनं लोकसभेला ३० जागा जिंकल्या होत्या. ही मतं टिकवून त्यात भर घालण्याचं आव्हान मविआसमोर होतं. पण लाडक्या बहिणींनी मविआचं गणित बिघडवलं. लोकसभेला २ कोटी ५० लाख मतं घेणारी मविआ थेट २ कोटी २७ लाख १० हजार २२० मतांवर घसरली. लोकसभेला मविआनं ४३.७१ टक्के मतं घेतली होती. विधानसभेला मविआला केवळ ३५.१६ टक्के घेता आली.
लोकसभेला महायुती आणि मविआत असलेला मतांचा फरक अतिशय नगण्य (२ लाख) होता. याच नगण्य तफावतीच्या जोरावर लोकसभेला मविआनं महायुतीपेक्षा १३ जागा अधिक जिंकल्या. आता विधानसभेत दोघांमधील मतांचा फरक तब्बल ९० लाखांचा आहे. मतांच्या टक्केवारीत बोलायचं झाल्यास लोकसभेला असलेली ०.१६ टक्क्यांची तफावत यंदा थेट १३.९२ टक्क्यांवर गेलेली आहे. त्यामुळेच महायुती आणि मविआला मिळालेल्या जागांमध्ये २३४ आणि ५० इतका प्रचंड मोठा फरक पाहायला मिळत आहे.