Ajit Pawar Rohit pawar Video : यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळ असलेल्या प्रीतीसंगमावर अजित पवार आणि रोहित पवार समोरासमोर आले. त्यावेळी आपल्या स्टाईलमध्ये रोहित पवारांना थोडक्यात वाचलास म्हणत दर्शन घे दर्शन काकाचं म्हणत दादांनी रोहित पवारांना दर्शन घ्यायला लावले. रोहित पवारांनीही अजित पवारांना वाकून नमस्कार केला. सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
नेमकं काय घडलं?
यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळावर दर्शन घेऊन अजित पवार निघाले होते. त्यावेळी रोहित पवारही आले होते, तेव्हा दादांनी त्यांना दर्शन घे म्हणत पाया पडायला लावले. रोहित पवारांनीही आपल्या काकांना वाकून नमस्कार केला. ढाण्या थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर काय झालं असतं, असं म्हणत दादा निघून गेले. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झालेला पाहायला मिळत आहे.
रोहित पवार काय म्हणाले?
माझे ते काका आहेत म्हणून पाया पडलो. विचारामध्ये भिन्नता आतातरी आहे, शेवटी संस्कृतीप्रमाणे वडीलधारी व्यक्तीच्या पाया पडणं माझी जबाबदारी आहे. २०१९ च्या निवडणुकीला त्यांनी मला खूप मदत केली होती. चव्हाण साहेबांच्या स्मृतिठिकाणावर भेदभाव करून चालत नाही. संस्कृती पाळणं महत्त्वाचं आहे तेच आम्ही केलं आहे. सभा झाली असती तर काही प्रमाणात वर-खाली झालं असतं. उलटंही होऊ शकलं असतं. मात्र ते बारामतीमध्ये अडकून पडले होते. शेवटी ते मोठे नेते होते आणि निर्णय त्यांचा होता. पक्षाचे आमदार निवडून आले चांगली गोष्ट आहे, आम्ही त्याचं अभिनंदन केल्याचं रोहित पवारांनी सागितलं.