Pune Election results 2024: या विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाला पुणे जिल्ह्यात केवळ एकच जागा मिळवता आली. त्यामुळे पक्ष नेतृत्वाला पुण्याकडे येत्या काळात विशेष लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
महाविकास आघाडीत निवडणूक लढविताना ठाकरे गटाने पुणे शहरात कोथरूड आणि जिल्ह्यात खेड-आळंदी येथील जागा लढवली होती. कोथरूडला माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांचा दारुण पराभव झाला. पक्ष नेतृत्वाने कोथरूडच्या विजयासाठी विशेष प्रयत्न केल्याचे दिसून आले नाही. प्रचारादरम्यान पक्षाचे नेते व खासदार संजय राऊत यांची रॅली काढण्यात आली. मात्र, सबंध प्रचार मोहिमेत एकही मोठी सभा ठाकरे गटाने घेतली नाही. त्यामुळे ठाकरे गटाची कोथरूडच्या प्रचार मोहिमेबाबतची भूमिका पाहून अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. वास्तविक, कोथरूडसाठी उमेदवार निवडताना पक्षासमोर पृथ्वीराज सुतार यांच्या रूपाने कोरी पाटी असलेला एक पर्याय उपलब्ध होता. सुतार गेल्या काही वर्षांपासून विधानसभेसाठी तयारीदेखील करीत होते. मात्र, त्यांना ‘होल्ड’ वर ठेवून मोकाटे यांना तिकीट देण्यात आले. त्यामुळेही अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.
खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटाचे बाबाजी काळे यांनी विद्यमान आमदार दिलीप मोहिते पाटील यांचा पराभव केला. या लढतीत काळे हे ‘जायंट किलर’ ठरले. मात्र, काळे यांच्या प्रचारासाठी आदित्य ठाकरे यांनी घेतलेली सभा वगळता पक्षाकडून प्रभावी नियोजन करण्यात आले नव्हते. येथील मोहिते विरोधक आणि सर्वपक्षीयांनी काळे यांना निवडणुकीत मदत केल्याची चर्चा आहे.
खेडची जागा पारड्यात पडल्याने शिवसेना ठाकरे गटाचे नाव जिल्ह्याच्या राजकारणात टिकून राहिले आहे. मात्र, त्याचा विस्तार करण्याची जबाबदारी कोण स्वीकारणार हे येत्या काळात पाहावे लागेल.