Eknath Shinde: विधानसभा निवडणुकीतील दिग्विजयानंतर सत्ता स्थापनेच्या घडामोडींना वेग आला आहे. मुंबईत भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या अंतर्गत बैठका सुरु आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना झाले आहेत.
देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला भाजपच्या नेतृत्त्वानं हिरवा कंदिल दिला आहे. त्यांच्या नावाला शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसनंदेखील मान्यता दिली आहे, अशी माहिती द इंडियन एक्स्प्रेसनं सुत्रांच्या हवाल्यानं दिली आहे. ‘मुख्यमंत्रिपासाठी फडणवीस यांच्या नावाला भाजपच्या नेतृत्त्वानं मंजुरी दिलेली आहे,’ अशी माहिती भाजपमधील सुत्रांनी दिली आहे. फडणवीस मुख्यमंत्री होतील आणि शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसला उपमुख्यमंत्रिपद देण्यात येणार आहे. महायुतीमधील सुत्रांनी ही माहिती दिलेली आहे.
मुख्यमंत्रिपद आपल्याकडेच राहावं यासाठी एकनाथ शिंदे यांचे बरेच प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी ते गेल्या ३६ तासांपासून वाटाघाटी करत आहेत. पण शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्रिपद मिळण्याची शक्यता नाही. त्यांना उपमुख्यमंत्रिपद दिलं जाऊ शकतं. शिवसेनेला १२ मंत्रिपदं दिली जाण्याची शक्यता आहे. त्यात काही महत्त्वाची खाती असतील. तर राष्ट्रवादी काँग्रेसला १० मंत्रिपदं मिळतील. भाजप स्वत:कडे २१ मंत्रिपदं ठेवणार आहे.
गृह, अर्थ, शहर विकास, महसूल ही महत्त्वाची खाती मित्रपक्षांना सोडण्यास भाजप सुरुवातीला तयार नव्हता. पण आता यातील काही खाती मित्रपक्षांना देण्याची तयारी भाजपनं दर्शवली आहे. गृह आणि अर्थ खाती आपल्याकडेच असावीत असा भाजपचा आग्रह आहे. यासाठी सध्या वाटाघाटी सुरु आहेत. अखेरच्या क्षणी मंत्रिपदांमध्ये, विभागांमध्ये बदल होऊ शकतो, असं सुत्रांनी सांगितलं आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी दिल्लीत आज महत्त्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीला शिंदे, फडणवीस आणि पवार हजर असतील. यामध्ये मुख्यमंत्रिपदासह अन्य मंत्रिपदांवर चर्चा करण्यात येईल. मित्रपक्षांना मंत्रिमंडळात सन्मानजनक वाटा देण्यात येईल, असा शब्द भाजपच्या केंद्रीय नेतृत्त्वाकडून शिंदे, पवारांना देण्यात आला आहे.